आता पिकाची रिअल टाईम नोंदणी सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध : राजशेखर लिंबारे

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र, दोन-तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र मोबाईल ऍप्लिकेशन निर्मिती केली असल्याची माहिती मोहोळचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी दिली.

    टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाइल ऍप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती ऍप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल.

    त्यामुळे मोहोळ तालुक्यातील सर्व शेतक-यांनी सदर मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून आपल्या पिकाची नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शेतक-यांचे फळपीक ऊस ही वार्षिक पिके असल्याने त्या क्षेत्राची अचूक नोंद ई-पिक पाहणी मध्ये भरण्यात यावी. सदरचे मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे १५/०९/२०२१ पर्यंत ई-पिक नोंदणी करण्यासाठी प्रत्येक गावातील महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, एनजीओ, महा ई सेवा केंद्रचालक यांच्या सहाकार्याने जास्तीत जास्त ई-पिक नोंदणी करणेसाठी सर्व मंडळ अधिकारी व तलाठी कर्मचारी यांना सुचित करण्याचे आवाहन लिंबारे यांनी केले आहे.

    सदरचे मोबाईल ऍप्लिकेशन https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.opeek या लिंकद्वारे उपलब्ध करून घेण्याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी तलाठी, मंडल अधिकारी तसेच तहसिल प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते.