आता तालुक्यातील महिलांचे संघटन मजबूत होणार : काका साठे

    उत्तर सोलापूर : आतापर्यंत उत्तर सोलापूर तालुक्यातील महिलांना एकत्रित करुन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम महिला नेत्रत्वाचा वाणवा होता. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा खेलबुडे-झाडे यांच्या रुपात महिलांना खंबीर नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील महिलांचे संघटन मजबूत होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांनी केले.

    उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा खेलबुडे-झाडे यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्त त्यांचा वडाळा येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी काका साठे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक दिपाली पांढरे, सोलापूर कृ षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, प्राचार्य डॉ. जी.एन.चिट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उद्योगपती प्रल्हाद काशीद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पवार, उपसभापती जितेंद्र शिलवंत, नूतन महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा खेलबुडे- झाडे, पंढरपूर तालुकाध्यक्षा रंजना हजारे, वडाळा ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे, बापूराव साठे, प्रा. डॉ. विकास शिंदे, विश्वनाथ खेलबुडे यावेळी उपस्थित होते.

    काका साठे पुढे म्हणाले, सुवर्णा झाडे यांनी मुंबई ठाणे परिसरात शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला असून त्यांचे माहेर मार्डी असल्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील महिलांसाठी काही तरी करण्याची प्रांजळ भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्यातील सक्षम महिला नेत्रत्व गुण ओळखून त्यांना राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षपदाची संधी दिली आहे. पक्षनिरीक्षक पांढरे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस माझा पक्ष आहे, या तळमळीतून प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्याने काम केले तर पवार साहेबांचे विचार प्रत्येक घरात पोहोचतील. देशाचे नेते पवार साहेबांनीच प्रथम महिला सक्षमिकरणाचे धोरण स्विकारले. त्यांनीच महिलांना आरक्षण लागू केले. तेव्हा त्यांचे राष्ट्रवादाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम महिलांनी केले पाहिजे, असे तालुकाध्यक्ष काशीद यांनी सांगितले.

    जितेंद्र साठे म्हणाले, ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण, ही विचारधारा पवारसाहेब व काकासाहेब साठे यांनी जपली. याच मार्गाने जाऊन तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील महिलांचे संघटन सुवर्णाताईंनी करावे. आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू. यावेळी नुतन तालुकाध्यक्षा सुवर्णा खेलबुडे-झाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. पत्रकार दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.