शनिवारी जिल्ह्यात मेगा लसीकरण मोहिम राबविणार : दिलीप स्वामी

    सोलापूर : मागील दोन आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यास पुरेशा प्रमाणात कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध होत आहे. शनिवारी लसीकरणासाठी दोन लाख डोसेस प्राप्त होत आहेत. त्यामुळे शनिवारी (दि.११) जिल्ह्यात मेगा लसीकरण मोहीम राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

    याबाबत स्वामी म्हणाले, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव व जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी प्राप्त झालेली लस एकाच दिवशी संपेल अशा पद्धतीने लसीकरणाचे सुयोग्य नियोजन आजपर्यंत केलेले आहे. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अविश्रांत मेहनत घेऊन लसीकरणाचे काम व्यवस्थितरीत्या पार पाडले आहे. निकषाप्रमाणे दिलेली लस त्वरित संपवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यास आज दोन लाख डोसेस मिळत आहेत.

    यापूर्वी लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून कुपनाची व्यवस्था राबवल्यामुळे लसीकरणाच्या कामात सुसूत्रता आली आहे.उद्या शनिवारी संपूर्ण जिल्हाभर वॉक इन व्हॅक्सीनेशन मोहिम राबविण्यात येत आहे.

    जिल्ह्यातील अद्याप लसीकरण न झालेल्या नागरिकांनी उद्या शनिवारी (दि.११) आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे.

    दरम्यान, कोविडच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे नागरीकांनी उद्या शनिवारच्या दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मेगा लसीकरण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावयाचे आहे.

    यासाठी शुक्रवारी दुपारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका समूह संघटक, आशा गटप्रवर्तक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मार्गदर्शन करुन मेगा लसिकरण मोहिम चांगल्या पद्धतीने यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकार डॉ.शितलकुमार जाधव यांनी केले आहे.