एमएचटी-सीईटी २०२१ साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु; स्वेरीमध्ये सुविधा उपलब्ध

    पंढरपूर : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘एमएचटी-सीईटी-२०२१’ ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे, अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी यांनी संकेतस्थळावरुन कळविले आहे.

    शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी २०२१ ही प्रवेश परीक्षा देणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ८ जून २०२१ ते ७ जुलै २०२१ (रात्री-११.५९) पर्यंत तर विलंब शुल्कासह अर्जाच्या नोंदणीसाठी ८ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२१ (रात्री ११.५९) असा कालावधी दिला आहे. सदरील परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी.

    विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यात बऱ्याचदा चूका होत असतात आणि धावपळही होत असते. त्यादृष्टीने स्वेरी अभियांत्रिकीच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये एमएचटी-सीईटी २०२१ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, ओळखपत्र/आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी एटीएम सोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.