प्रशासन, अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरांना वठणीवर आणा; विरोधकांचा टोला

  सोलापूर : उजनी धरणातून पाणी उचलण्याकरिता धरणात जॅकवेल बांधण्याचे काम चालू आहे. जॅकवेलच्या कामाची प्रगती ही फक्त कागदावरच दिसते, असा टोला विरोधकांनी ऑनलाइन सर्वसाधारण सभेमध्ये स्मार्ट सिटीच्या कामकाज पद्धतीवर लगावला. यासभेस महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी.शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सभागृहनेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक नागेश भोगडे आदी उपस्थित होते.

  सोलापूर शहरासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या दुहेरी पाईपलाईनच्या कामाची चर्चा माध्यमातून जोरात सुरू आहे. मोदी सरकारची स्मार्ट सिटी योजना, एनटीपीसी आणि महापालिकेच्या निधीतून समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे. उजनी धरणावर सोलापूर मनपा आणि उस्मानाबाद नगरपालिकेचे पंपगृह आहे. दोन्हीं पंपगृहांच्या मधोमध समांतर जलवाहिनीचा जॅकवेल होत आहे. पोचमपाड कंपनीला पावसाळ्यापूर्वीच जॅकवेलची जागा ताब्यात देण्यात आली. पावसाळ्यात उजनी धरण काठोकाठ भरते. पाणी वाढल्यानंतर जॅकवेलच्या कामाला अडथळा येऊ नये म्हणून धरणाच्या काठावर मातीचा मोठा बंधारा टाकण्यात आला. जॅकवेलसाठी खोदाई सुरू झाली. पोचमपाड कंपनीच्या लोकांनी बंधारा टाकण्यात हलगर्जीपणा केला. त्यामुळे उस्मानाबाद जॅकवेलच्या बाजूने बंधाऱ्यात पाणी शिरले. सध्या बंधारा पाण्याने काठोकाठ भरल्याने खोदाईचे थांबले आहे.

  उजनी धरणातील जॅकवेलच्या कामाची प्रगती ही फक्त कागदावरच दिसते स्मार्ट सिटीचे अधिकारी, पालिका पदाधिकारी अधिकारी हे सोलापूरकरांची नुसती दिशाभूल करण्यामध्ये व्यस्त आहेत असं म्हणत काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी सत्ताधाऱ्यांना जॅकवेलच्या कामकाज पद्धतीवर नजर ठेवता येत नसल्याची खंत व्यक्त केली. प्रशासन, अधिकारी आणि काँट्रॅकटर यांना वठणीवर आणा असेही मत त्यांनी यावेळी मांडले.

  उजनीचे पाणी सोलापूर वासियांना मिळू नये याकरता अनेक स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत अशा परिस्थितीत नेटाने आणि वेळेच्या आत उजनी दुहेरी पाईपलाईनचे काम होणे अपेक्षित आहे पण तसे होताना दिसत नाही लवकरात लवकर दुहेरी पाईपलाईन आणि जॅकवेलच्या कामाला गती द्यावी अशी मागणी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी यावेळी केली.

  उजनी धरणात जॅकवेल टाकण्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी यावेळी केली.

  दुहेरी पाईपलाईन आणि उजनी धरणातील जॅकवेल कामांमध्ये होत असलेली दिरंगाई योग्य नाही वेळेच्या आत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे तसे होत नसेल तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी यावेळी दिले.

  वारंवार सांगून देखील मुदतीच्या आत उजनी धरणात जॅकवेल टाकण्याच्या कामाला गती मिळत नाही संबंधित कामाच्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचे कामकाज चालू आहे हे पाहण्याकरता पालिका पदाधिकारी आणि गटनेत्यांनी पाहणी दौरा करावा अशी मागणी यावेळी पदाधिकारी आणि गटनेत्यांनी केली.