…अन्यथा निधी वाटपाला स्थगिती आणू; आमदार कल्याणशेट्टी यांचा इशारा

    सोलापूर : जिल्हा परिषद सदस्यांना समसमान निधी वाटप करा, अन्यथा राज्य सरकारकडून निधी वाटपाला स्थगिती आणू, असा इशारा अकलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, सीईओ दिलीप स्वामी यांना दिला.

    सचिन कल्याणशेट्टी यांनी अध्यक्ष कांबळे आणि सीईओ स्वामी यांची भेट घेतली. अकलकोट विधानसभेतील जि.प.सदस्यांना असंतूलित निधी वाटप करण्यात आला आहे. निधी वाटपात सातत्याने डावले जात आहेत. जनसुविधा, नागरी सुविधा, पंधरा वित्त आयोग, तीर्थक्षेत्र,लघू पाटबंधारे, ३०:५४ , ५०:५४ च्या निधी कोणत्या निकषाद्वारे देण्यात आले, याची सविस्तर माहिती देण्यात यावी अशी मागणी कल्याणशेट्टी यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष शिवानंद पाटील, पक्षनेता अण्णाराव बाराचारे, प्रशांत कडते, सचिन पाटील उपस्थित होते.

    दरम्यान, पक्षनेता अण्णाराव बाराचारे यांनी निधी वाटपाबाबत गंभीर आरोप केला आहे. मर्जी सदस्यांना आर्थिक देवाण करुन भरघोस निधी देण्यात आला आहे. भाजप सदस्यांना निधी देऊ नका अशी सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचा आरोप पक्षनेता बाराचारे यांनी केला आहे. सर्वसाधारण सभा होत नसल्याने अधिकारी वर्ग मनमानी कारभार करित आहेत. तात्काळ सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी अध्यक्षांकडे केली आहे.

    भरणे यांनी निधी वाटपात घातला खोडा

    पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जि.प.च्या निधी वाटपात खोडा घातला. त्यांच्या सूचनेनुसार अधिकारी कामे करीत आहेत. माझ्या अधिकारातील ५ टक्के निधीचा कोटा भरणे यांनी कपात केला, असे अनिरुध्द कांबळे यांनी सांगितले.