शिवशाहीमधून आलेल्या संतांच्या पालख्या पंढरीत दाखल; वारकरी स्वागतासाठी सज्ज

    पंढरपूर / राजेश शिंदे : आषाढी एकादशीनिमित्त होणारा पायी पालखी सोहळा यंदा देखील रद्द झाल्याने शिवशाहीतून दाखल झालेल्या पालख्यांचा सोहळा सोमवारी (दि. १९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरीत दाखल झाला. एसटी बसमधून आलेल्या या पालख्यांच्या स्वागतासाठी भाविक वारकरी दर्शनासाठी आणि पादुकांवर फुले वाहण्यासाठी उपस्थित होते. तर एकादशी निमित्त उद्या (दि.20) पहाटे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडणार आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा वाढता प्रभाव होऊ नये, यासाठी प्रशासनाने यंदाही पायी पालखी सोहळ्यावर बंदी घातली आहे. सुप्रीम कोर्टाने देखील लाखो वारकऱ्यांना जमण्यास कायद्याने बंदी केली आहे. यावर्षी ठरलेल्या संकेतानुसार पायी पालखी सोहळा रद्द करून राज्यातील महान संतांच्या पालख्या या शिवशाही एसटी बसमधून नेण्यास काही मोजक्या लोकांसह देण्यास शासनाने परवानगी दिली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सर्व पालख्या वाखरी येथील पालखीतळावर जमा झाल्या होत्या. यानंतर या पालखी सोहळ्याने पंढरपूर शहरात प्रवेश केला. यावेळी शेकडो भाविक वारकरी पादुकांच्या दर्शनासाठी उपस्थित होते.
    पालखी सोहळ्याच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या पात्रात होणारे चंद्रभागा स्थान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी वाळवंट तसेच आजूबाजूचा परिसर व प्रदक्षिणामार्ग याठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त लावलेला आहे. पालखी मार्गाला जोडणारे उपनगरातील सर्व रस्ते पोलिसांनी बेरेकेटिंग लावून बंद केले आहेत.
    तसेच एकादशीसाठी कोणतेही परगावाहून येणारे भाविक पंढरपुरात दाखल होऊ नये, म्हणून पोलिसांनी पंढरपूरकडे येणाऱ्या रस्त्यांवर पाच ठिकाणी नाकाबंदी केली आहे. वाखरी येथील पालखी तळावर पालख्यांचे स्वागत करण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक पुदलवाड, व्यवस्थापकीय अधिकारी विठ्ठल जोशी, तसेच ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सो तेजस्विनी सातपुते, तसेच मंदिर समिती अध्यक्ष व समिती सदस्य, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.