पंढरपूर नगरपालिका दवाखान्याला दोन महिन्यांपासून टाळे; नगरवासियांच्या आरोग्य सुविधा टांगणीला

कोरोनाच्या लाटेमध्ये सर्वत्र लॉकडाउन असल्याने व्यापार व आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे नगरपालिकेची कर वसुली होत नसल्याने नगरपालिका देखील आर्थिक संकटात आहे.

  पंढरपूर : कोरोनामुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार, थकलेली कर वसुली आणि नगरपालिकेची आर्थिक हलाखीची परिस्थिती यामुळे नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये वैद्यकीय सुविधा देणे मुश्कील झाल्यामुळे या आरोग्य केंद्राला गेल्या दोन महिन्यांपासून टाळे लागले आहे. यामुळे पंढरपूर शहरातील गरीब, आर्थिक दुर्बल तसेच कामगार वर्ग नाईलाजाने खाजगी दवाखान्यात न परवडणारे उपचार घेताना दिसत आहेत. याचा जाब आता येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मतदार मतपेटीतून नक्कीच विचारताना दिसतील.

  पंढरपूर शहर हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र असल्याने महाराष्ट्र शासनाकडून यात्रा अनुदान म्हणून पंढरपूर नगरपालिकेला चार कोटी रुपयांचा निधी आरोग्यसेवा पुरविण्यासाठी दिला जातो. मात्र, यात्राकाळात चार लाखांची कामे होताना देखील दिसत नाहीत. मग हा निधी जातो कुठे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ठिकाणी साठलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे आणि नेमक्या अशा वेळेसच नगरपालिकेचे आरोग्य केंद्र कुलूपबंद अवस्थेत आहे.

  पुरेसा निधी नसल्यामुळे नेमणूक नाही : नगराध्यक्षा

  कोरोनाच्या लाटेमध्ये सर्वत्र लॉकडाउन असल्याने व्यापार व आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे नगरपालिकेची कर वसुली होत नसल्याने नगरपालिका देखील आर्थिक संकटात आहे. त्यामुळे ३० जून जून २०२१ रोजी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन नेमणूक करणे, पंढरपूर नगरपालिकेला शक्य झाले नाही. शासनाने आर्थिक मदत दिली आणि नेमणूक केली, तरच नगरपालिका दवाखान्याचे कुलूप उघडणे शक्य होईल. सध्या नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे, असा खुलासा पंढरपूर नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दै. ‘नवराष्ट्र’शी बोलताना केला आहे.

  दोन्ही आमदारांना मात्र आरोग्यापेक्षा मंदिराची चिंता?

  धक्कादायक बाब म्हणजे पुढच्या काही दशकांचा विचार करून नागरिकांना सुविधा पुरवण्याचा सूर काढणाऱ्या विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान आवताडे या पंढरपूरच्या दोन्ही आमदारांना पंढरपूरकर नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यापेक्षा विठ्ठल मंदीर उघडण्याची घाई झाली आहे. खरेतर नगरपालिका दवाखान्याचे दरवाजे उघडण्याची या दोन्ही आमदारांनी प्रयत्न करावेत, अशी जनतेची अपेक्षा आहे.