पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात १४०० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार : डॉ. गिराम

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोविड रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील तसेच परिसरातील १ हजार ४०० पेक्षा जास्त गरीब व गरजू रुग्णांवर आतापर्यंत उपचार करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली.

    कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी उपजिल्हा रुग्णालयात ५० बेडचे कोविड हॉस्पिटलची क्षमता असतानाही १०० ते १५० कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल करुन घेतले होते. अपुरे मनुष्यबळ असतानाही कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार करण्यात आले. तसेच ऑक्सिजनची बचत करण्यासाठी ‘नॉन रिब्रीदींग मास्क’चा प्रयोग प्रथमच करण्यात आला. त्यामुळे रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन मिळण्याबरोबर ऑक्सिजनची बचतही मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहिती डॉ.गिराम यांनी यावेळी दिली.

    उपजिल्हा रुग्णालयांत कोविड रुग्णांच्या उपचारासोबतच इतर आजाराच्या रुग्णांवरही उपचार करण्यात येत आहेत. तसेच आतापर्यत ७ हजार ९९० जणांची कोविड आरटीपीसीआर चाचणी व १६ हजारपेक्षा जास्त संशयित व्यक्तींची रॅपिड ॲटिजेन चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी डॉ.सचिन वाळुजकर, डॉ.शिवकमल तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र उपचार केल्याचेही डॉ. गिराम यांनी सांगितले.

    जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ.प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्याचेही डॉ.गिराम यांनी सांगितले.