सोलापूर जिल्ह्यातील कुपोषित व दुर्धर आजाराने ग्रस्त बालकांचे पालक कोविड लसीकरणाचा प्राधान्यक्रमामध्ये ; सीईओ स्वामी यांचा निर्णय

दिनांक १० जूनपासून सुरू होणाऱ्या ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी मोहिमेत निदान झालेल्या SAM व MAM बालके, दुर्धर आजारी, -हदयरोग्रस्त बालकांची यादी अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्याध्यापक यांनी अद्ययावत करून घेतील व या याद्या बालविकास प्रकल्प अधिकारी एकत्र करून तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्याव्यात.

    सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांना मध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेने कुपोषित तसेच गंभीर आजारी असणाऱ्या बालकांच्या पालकांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमात प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सीईओ स्वामी म्हणाले की दुसऱ्या लाटेत सुमारे १२% बालके बाधित झाली आहेत. कुपोषणग्रस्त तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त बालकांना त्यांच्या पालकांकडून संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १० जूनपासून सुरू होणाऱ्या ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी मोहिमेत निदान झालेल्या SAM व MAM बालके, दुर्धर आजारी, -हदयरोग्रस्त बालकांची यादी अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्याध्यापक यांनी अद्ययावत करून घेतील व या याद्या बालविकास प्रकल्प अधिकारी एकत्र करून तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्याव्यात. तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व गावनिहाय याद्या वैद्यकीय अधिकारी यांना देतील आणि वैद्यकीय अधिकारी या याद्यांप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण प्राधान्याने करून घेतील.

    जिल्हा परिषद प्रशासन कोविड-१९ ची तिसरी लाट थोपवण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यात प्रथमच कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेगळा पॅटर्न सुरू केला आहे.