पोहरगावातील मोकाट वाळू माफियांवर पोलिसांची कारवाई; तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक व चोरीच्या प्रकारात वाढ होत आहे. असे असतानाच पंढरपूर तालुका पोलिसांनी याबाबत कारवाई करण्याची मोहीम सुरु केली. त्यामुळे त्यांच्या या कारवाईत तालुक्यातील पोहरगाव येथे केलेल्या कारवाईत तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू भरलेली असा १४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत तीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

    ग्रामीण पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी अवैध वाळू धंद्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करुन सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खरात यांनी गुप्त माहिती काढून सदर माहितीवरून त्यांच्या पथकाने पोहोरगाव, तालुका-पंढरपूरमध्ये चालू असलेल्या चोरून वाळू चोरीवर कारवाई केली. सदर कारवाईत टाकलेल्या छाप्यामध्ये ३ ट्रॅक्टर मॉडेल ६०५ त्याला प्रत्येकी एक डम्पिंग ट्रॉली जोडलेली आणि सदर डम्पिंग ट्रॉलीमध्ये भरलेली अवैध वाळू असा एकूण १४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका पोलिसांनी दिली.

    सदरच्या वाळूचोरी प्रकरणांमध्ये आरोपी संतोष दादाराव पाटील (वय २६), नितीन धनाजी गायकवाड (वय २४), बालाजी शंकर गायकवाड (वय २६, सर्व रा. पोहरगाव तालुका, पंढरपूर) यांनी संगनमत करून सदरचा गुन्हा केल्याने तीनही आरोपींना अटक करण्यात आली. यातील आरोपी संतोष दादाराव पाटील याचे वडील पोहोरगावचे पोलीस पाटील आहेत. तसेच त्यांच्यावर वाळूचोरीचे यापूर्वी देखील दोन गुन्हे नोंद आहेत.

    दरम्यान, ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर ओलेकर, पोलिस उपनिरीक्षक सचिन वसमळे, पोलीस शिपाई देवेंद्र सुर्यवंशी, होमगार्ड सचिन मदने, सोमनाथ सूळ यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंदनशिवे हे करत आहेत.