जनावरांचे पाय बांधून नेत होते गाडीतून, पोलिसांना संशय आला अन्…

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जनावरांचे पाय बांधून स्कार्पिओ गाडीतून मोहोळकडून सोलापूरकडे कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना सावळेश्वर टोल नाक्यावर मोहोळ पोलिसांच्या पथकाने गाडी अडवून त्यातील चार जनावरांची सुटका केली. याप्रकरणी दोघांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी आबु मुलाणी व कर्नाळकर असे दि. ३ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान सावळेश्वर परिसरात रात्रगस्त करत असताना त्यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मोहोळ कडून सोलापूरकडे निघालेल्या स्कर्पिओ नंबर (एम.एच. ४५, ए.७०१६) मधून जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जात आहेत. त्यानुसार सोलापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचे पथक थांबले होते. समोरून येणाऱ्या स्कार्पिओ ला पोलिसांनी हात करून रस्त्याच्या कडेला घेतली असता त्या स्कार्पिओमध्ये जर्षी लहान-मोठी व लहान, मोठी देशी गाई असे एकुण चार गाई दाटीवाटीने कोंबून भरल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांचे चारी पाय बांधून कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे दिसले.

    चालक जाज सईफान कुरेशी रा. विजापूर वेस सोलापूर व त्याचा साथीदार फयाज रिजवान पटेल रा.मुस्लीमपाच्या पेठ, सोलापूर या दोघांकडे परवान्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या गाई सोलापूरच्या कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचे सांगितले. प्राण्यांना क्रुरतेने वागविणे, प्राणी छळ प्रतिबंध अधिनियमानुसार वरील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून २० हजार रुपयांच्या गाई व ४ लाख रुपयांची स्कार्पिओ गाडी असा मुद्देमाल जप्त केला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील चवरे करत आहेत.