स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक रणधुमाळी डोळ्यासमोर ठेऊन सोलापुरात पक्षांतराचे वारे

  सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यातील महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात आता पक्षांतराचं वारं वाहू लागले आहे. नेते आणि कार्यकर्ते पक्ष बदलत आहेत. किंबहुना मुहूर्त पाहून बदलण्याच्या तयारीत आहेत. बरेच नेते आणि कार्यकर्ते घूम फिरके शांतीनगर असा प्रवास करीत आहेत. जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत पक्षांतराच्या वाऱ्याचा वादळ होणार हे नक्कीच. पक्ष बदलत असताना बरेचसे नेते आणि कार्यकर्ते सांगत असतात की शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सुख सेवेसाठी आम्ही पक्ष बदलत आहोत.

  खरंतर सत्तेत राहण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी पक्षांतर होत असतं कारण आणि राजकारण हे चालत राहणारच यात काही वावगं नसावं. शेवटी ज्याचा त्याचा वैचारिक पातळी जातो प्रश्न आहेत. एरवी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना पाण्यात पाहत असतात परंतु अंड निवडणूकीत पक्षांतर होत असतं आपण ज्या पक्षात जाणार आहोत तोच पक्ष शहराचा विकास करू शकतो असा साक्षात्कार पक्ष बदलणारे यांना होत असतो यात काही आता नवा नाही.

  सोलापुरातील महेश कोठे तोफिक शेख आनंद चंदनशिवे यांच्या पक्षांतराची चर्चा शहर जिल्ह्यात होत आहे. हे तीन नगरसेवक आपल्या समवेत डझन, अर्धा डझन आणि पाव डझन नगरसेवक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

  महेश कुठे हे काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले आहेत. महानगरपालिकेवर एक हाती सत्ता राबवणारा नेता म्हणून शहरात ओळखलं जायचं.सन 2009 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्याच्या धोरणामुळे पराभव झाल्याचे त्यांनी कित्येक वेळा बोलून दाखवलं आहे. माझ्यावर काँग्रेस पक्षात अन्याय झाला म्हणून त्यांनी थेट मातोश्री गाठले आणि जिल्हाप्रमुख झाले सार्वत्रिक निवडणुकीत शहर मध्य मध्ये हाती धनुष्य बाणाचा चिन्ह घेऊन निवडणुकीला समोर गेले.

  एआयएमआयएम, काँग्रेस आणि शिवसेना अशा तिहेरी लढतीत त्यांचा पुन्हा एकदा पराभव झाला. परंतु महानगरपालिकेत त्यांनी त्याची कसर भरून काढली. शिवसेना स्थापनेपासून ते सन 2017 पर्यंत सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेला कधीही दोन अंकी सदस्यसंख्या गाठता आली नव्हती. महेश कोठे यांनी महानगरपालिकेचे सूत्र हाती घेतले आणि एकवीस नगरसेवक निवडून आणले त्यामुळं एक स्वीकृत सदस्य ही शिवसेनेच्या पदरात पडलं. महानगरपालिकेतील दोन नंबरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेता हे पद शिवसेनेला पहिल्यांदाच सोलापुरात मिळाला आहे. शिवाय कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना विविध समित्यांवर निवडून आणत सभापती बनवलं. मात्र, सन 2019 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षांनं त्यांचे तिकीट कापलं. ती निवडणूक त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढवली आणि त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आपल्यावर अन्याय झाला आपल्याला तिकीट नाही मिळालं पक्षाने आपले तिकीट कापलं यामुळे महेश कोठे यांच्या डोक्यात टीकटीक वाजायला सुरुवात झाली. आता ते डझनभर नगरसेवकांसह पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.

  नगरसेवक तौफीक शेख यांचा राजकारणाचा मूळ पिंड काँग्रेसचाच त्यांचं कुटुंबही काँग्रेस विचारधारेला माननारे आहे. मोठे बंधू आरिफ शेख यांना महापौर करण्यामागे तैफिक शेख यांचा हात असल्याचं बोललं जातं हे दोघे बंधू पूर्वी काँग्रेसमधूनच निवडून आले होते. सन 2012 साल च्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत तौफीक शेख यांचा पराभव झाला. महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक मिळावा याकरिता वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा केला परंतु स्थानिक आमदार मूळ ते शक्य झालं नाही. आपल्यावर आणि आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होतोय असं म्हणत तोफिक शेख यांनी AIMM पक्षात प्रवेश केला आणि सन 2014 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शहर मध्य मधून लढवली. अत्‍यंत चुरशीने झालेल्‍या निवडणुकीत शहर जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं परंतु या लढतीत त्यांचा निसटता पराभव झाला. पुढे त्यांनी सन 2017 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत AIMIM पक्षाचे 9 नगरसेवक निवडून आणले.

  सन 2019 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. कारण एका गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली ते कर्नाटकाच्या कारागृहात होते. ते पक्षाला वारंवार सांगत होते माझ्यावर आरोप आहे आणखीन तो सिद्ध झाला नाही माझ्यावर अन्याय करू नका मला नाही तर माझ्या पत्नीला तिकिट द्या.परंतु पक्षांन नवख्या उमेदवारास शहर मध्य मधून उमेदवारी दिली. त्यामुळे तोफिक शेख यांनी हातातली पतंग सोडण्याचा निर्णय घेतला आणि मनगटी घड्याळ बांधण्याचा निर्धार केला एक स्वीकृत सदस्य धरून दहा नगरसेवक AIMM पक्षाचे आहेत. त्यापैकी अर्धा डझन नगरसेवक तैफिक शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे मोठे बंधू माजी महापौर आरिफ शेख यांनीही काँग्रेस पक्षाचे तिकीट न मिळाल्याचे कारण पुढे करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि सन 2017 ची महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला. आता त्यांची घरवापसी झाली आहे ते काँग्रेसवासी झालेत.

  नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची सुरुवात सामाजिक संघटनेच्या माध्यमातून झाली. आनंद चंदनशिवे आणि बाळू वाघमारे हे खास जिवलग मित्र सुरुवातीच्या काळात आनंद चंदनशिवे यांना बहुजन समाज पक्षाचे तिकीट मिळवून देण्यासाठी बाळू वाघमारे यांनी खूप प्रयत्न केल्याचं बोललं जातं. कारण ज्या वार्डात आनंद चंदनशिवे बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छित होते त्या वार्डाच्या तात्कालीन नगरसेविका गायकवाड या बहुजन समाज पक्षाच्या होत्या. शिवाय त्यांचे पती विद्यमान नगरसेवक रवी गायकवाड यांना मानणारा कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्यानं चंदनशिवे यांना तिकीट मिळेल का नाही याची शक्यता कमी होती. शेवटी विद्यमान नगरसेविकेच तिकीट कापून आनंद चंदनशिवे यांना बहुजन समाज पक्षाचे तिकीट मिळालं. बरं सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक अवघड होत गेली त्यातून चंदनशिवेनी विजय मिळवला.

  बहुजन समाज पक्षाच्या हत्तीवर बसून त्यांनी तीन टर्म महानगरपालिकेत प्रवेश केला. सध्याच्या प्रभाग क्रमांक पाच मधून त्यांनी स्वतःच्या हिमतीवर चार नगरसेवकाचं पॅनल निवडून आनले. सन 2019 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस भाजपच्या एखाद-दुसरा नगरसेवक आणि बहुजन समाज पक्षाच्या चार नगरसेवकांनी उघडउघड वंचित बहुजन आघाडी चा प्रचार केला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी घर वापसी केली.

  आनंद चंदनशिवे आणि इतर तीन नगरसेवकांना बहुजन समाज पक्षात विरोध होऊ लागला. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विचार न करता वंचित बहुजन आघाडी मध्ये दोन नगरसेवकांना घेऊन प्रवेश केला. उर्वरित एक नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहे. वंचित बहुजन आघाडी मध्ये एक अलिखित करार असल्याचं बोलं जातं, जो उमेदवार खासदारकीच्या निवडणुकीला थांबतो त्याने आमदारकीला थांबायचं नाही, जो उमेदवार आमदारकीची निवडणूक लढतो त्यांन नगरसेवक निवडणुकीसाठी थांबायचं नाही. यामध्ये आनंद चंदनशिवे यांची गोची झाल्याचे दिसून येतं. सन 2019 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मधून आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडी च्या तिकीटावर आपलं नशीब आजमावले. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. परंतु त्यांनी 27 हजार मते घेऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

  आता नगरसेवकाचं तिकीट मिळेल की नाही याची शंका वाटू लागली असावी आणि शहराचा सर्वांगीण विकास फक्त बारामती करत करू शकतात असा साक्षात्कार त्यांना झाल्यामुळे आनंद चंदनशिव यांनी मिलिंद नगर हुन इंदापूर मार्गे बारामती गाठली आहे. आता ते म्हणताहेत आमचं ठरलंय वंचित चे पाव डझन नगरसेवक आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत.

  शिवसेनेचे एक डझन, AIMIM चे अर्धा डझन आणि वंचित चे पाव डझन नगरसेवक लवकरच शरद पवारांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत पक्षांतराच्या वाऱ्याचं वादळात रूपांतर झाल्यास नवल वाटायला नको.