….मग आम्ही यांचे हिशेब चुकते करु; प्रविण दरेकरांचा इशारा

  अकलूज : राज्यकर्ते कसे नसावेत आणि जनाधार नसताना एखादं सरकार सत्तेत आलं तर ते किती खराब काम करु शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना राजकीय विरोध करुन सूड घेण्यासाठीच या तिघाडी सरकारमधील राष्ट्रवादी धडपडत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
  अकलूज-माळेवाडी नगर परिषद व नातेपुते नगर पंचायतीस परवानगी अडवून ठेवल्याबद्दल या तीन गावचे लोक गेल्या २३ दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी दरेकर आज अकलूज येथे आले होते.
  दरेकर पुढे म्हणाले, येथील पालकमंत्री पालकमंत्री नसून बालकमंत्री आहेत. त्यांच्या अंगातील बालिशपणा अद्याप गेलेला नाही. म्हणून त्यांनी अजून उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली नाही. अधिवेशन पूर्ण दिवसांचे झाले असते तर आम्ही या सरकारला जाब विचारला असता. पण हे पळपुटे सरकार आहे. विरोधकांना घाबरुन यांनी अधिवेशन गुंडाळले.
  या सरकारमध्ये सत्तेचा मुकूट जरी शिवसेनेच्या डोक्यावर असला तरी सर्व अधिकार मात्र राष्ट्रवादीकङेच आहे. यांच्या नसानसात राजकारण भरले आहे. लवकरच हे सरकार पडेल. मग आम्ही यांचे हिशेब चुकते करु.
  यावेळी विजयसिंह मोहीते पाटील, आमदार रणजितसिंह मोहीते पाटील, आ. प्रशांत परिचारक, मदनसिंह मोहीते पाटील, नंदिनीदेवी मोहीते पाटील, शिवतेजसिंह मोहीते पाटील यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.
  विजयदादांनी राज्याला भरभरुन दिले
  विजयदादा जेव्हा ग्रामविकासमंत्री होते. उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी राज्यात प्रचंड विकासकामे केली. अगदी विरोधकांचीही कामे ते भेदभाव न ठेवता करत होते. आताचे सरकार मात्र नागरिकांचा विकास न करता स्वतःच्याच विकासात गुंतले आहे, असे आमदार परिचारक यांनी सांगितले.