जिल्ह्यात मान्सूनपूर्व अणूजैविक पाणी नमुने तपासणी अभियान : दिलीप स्वामी

  सोलापूर : सध्याच्या मान्सून हंगामामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी १ जून २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत मान्सूनपूर्व अणूजैविक पाणी नमुने तपासणी अभियान राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

  याबाबत माहिती देताना स्वामी म्हणाले, जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण ९४१७ इतके पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. तसेच १५२२ इतक्या नळ पाणी पुरवठा योजना आहेत, अशा एकूण १० हजार ९३९ इतक्या स्त्रोताचे पाणी नमुने जैविक तपासणीस पाठविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली राहावी आणि मान्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होऊ नये, पर्यायाने दूषित पाण्यामुळे गावात कोणतेही साथीचे रोग उद्धवू नयेत. म्हणून हे पाणी नमुने तपासणी ही वर्षातून मान्सूनपूर्व व मान्सूननंतर केली जाते.

  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या ५ ऑक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक/आरोग्य सेवक यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील जलसुरक्षक यांनी पाणी टीसीएल पावडर (ब्लिचिंग पावडर) द्वारे शुद्धीकरण केले जाते. शुद्धीकरणानंतर या पाण्याच्या तपासणीसाठी सुमारे १५० ते २०० मिलीच्या प्रमाणात प्रत्येक स्त्रोताचे पाणी नमुने हे निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटीत घेऊन पाणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावयाचे आहेत.

  तसेच तपासणीअंती पाणी नमुना दूषित आलेल्या स्त्रोतांची पूनर्तपासणी केली जाते. सध्या जिल्ह्यात पाणी नमुने तपासणीसाठी जिल्ह्यातील उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यासाठी सोलापूर येथे जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा तसेच अक्कलकोट तालुक्यासाठी अक्कलकोट, बार्शी तालुक्यासाठी बार्शी, करमाळा तालुक्यासाठी करमाळा, माढा तालुक्यासाठी कुर्डूवाडी, माळशिरस तालुक्यासाठी अकलूज, पंढरपूर व मोहोळ तालुक्यासाठी पंढरपूर, मंगळवेढा सांगोला तालुक्यासाठी सांगोला उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

  दरवर्षी पावसाळ्यात दूषित पाणी वाहून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होतात. म्हणून ग्रामस्थांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण करुन घेण्यासाठी व पाणी पुरवठा टाकीची (जलकुंभ ) स्वच्छता करुन घेणेसाठी जिल्हास्तरावरुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या माध्यमातून  सर्व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी , तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली तर गाव स्तरावर ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली सनियंत्रण केले जाते.

  पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य साथीचा उद्रेक टाळण्यासाठी योग्य पद्धतीने नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करुन पाणी पुरवठा करणे, जलस्त्रोतांजवळचा व जलवाहिन्यांजवळचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी पुरवठा यंत्रणांची वेळेवर व सुयोग्य देखभाल ठेवणे, गट विकास अधिकारी , तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रा.पा.पु.चे उपअभियंता यांनी दूषित पाणी नमुन्याबाबतचा आढावा घेऊन याबाबत आवश्यक ती उपाययोजना करुन जिल्हा स्तरावर अहवाल सादर करणे, गावात सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होतो किंवा नाही याची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना करणे.

  तसेच डास, माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छता विषयक उपाययोजना करणे, पाणी शुद्धीकरणासाठी ३३ टक्के क्लोरीन असलेली ब्लिचिंग पावडर , सोडिअम हायपोक्लोराईड , तुरटी यांचा तीन महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करणे , पाणी पुरवठा करणारी यंत्रणा सुव्यवस्थित ठेवणे तसेच गावात वेळोवेळी पिण्यासाठी शुद्ध पाणी पिण्याची काळजी घेण्यासाठी जनजागृती अत्यंत आवश्यक असल्याचेही स्वामी यांनी सांगितले.

  दरम्यान, यंदाच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यातील ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी १ जून २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत मान्सूनपूर्व अणुजैविक पाणी नमुने तपासणी अभियानामध्ये पाणी नमुने ग्रामपंचायतींनी तपासून घ्यावेत असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार यांनी केले आहे.