प्राथमिक शिक्षणाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

    सोलापूर :जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासमोर दिशाभूल करणारे बदली अहवाल सादर केल्याने त्यांच्यावर चौकशी नेमण्यात येत आहे.

    उत्तर सोलापूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी बाबुराव जमादार आणि लिपीक संजय कांबळे यांची ही चौकशी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

    याबाबत माहिती आशी की प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांनी मर्जीतील एस. पी. चव्हाण या उपशिक्षकला अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव पाटील वस्ती प्राथमिक शाळेतून उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमान्य नगर येथे शिक्षण समिती सभेच्या 2019 सालातील ठराव दाखवून सोयीनुसार बदली केली होती. त्यामुळे तेथील कार्यरत असलेल्या शिक्षकांना सरप्लस होण्याची वेळ आली होती.

    मर्जीतील शिक्षकाची नियुक्ती नेहरू वस्तीग्रह येथे देण्यात आली होती. वास्तविक गेल्या वीस वर्षापासून एस पी चव्हाण नामक शिक्षक अधीक्षक पदावर अतिरिक्त भार सांभाळून काम करण्याचे दाखवण्यात आले होते. या बेकायदेशीर बदली संदर्भात राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले आणि जुनी पेन्शन शिक्षक संघटनेने न्याय देण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांची पटसंख्या ही बोगस दाखवून मर्जीतील शिक्षकाची नियुक्ती देण्यात आली होती .

    मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची दिशाभूल झाल्याचे निर्देशनास येताचं दिलीप स्वामी यांनी ही बदली रद्द केली आहे .