पाटस येथील दुहेरी हत्याकांडाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा; दौलत शितोळे यांची मागणी

    पाटस : तालुक्यातील पाटस येथील दोन युवकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा खटला हा जलगती न्यायालयात चालवा. या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, या घटनेत सहभागी असलेल्या उर्वरीत आरोपींना त्वरीत अटक करावे, अशी मागणी जयमल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशध्यक्ष दौलत शितोळे यांनी केली. दरम्यान, यावेळी विविध मागण्यांचे निवेदन दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले.

    पाटस येथील शिवम संतोष शितकल आणि गणेश रमेश माकर या दोन तरूणांची 4 जुलैला क्रुरपणे हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध म्हणून आणि उर्वरीत आरोपींना अटक करावी. यासह विविध मागण्यासांठी जयमल्हार क्रांती संघटनेच्या प्रदेशध्यक्ष दौलत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली
    वतीने दौंड तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर हा मोर्चा आल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत झाले.

    दौलत शितोळे म्हणाले की, राज्यात रामोशी समाजावर अन्याय अत्याचार वाढले आहेत. पाटस येथील दोन निष्पाप तरूणांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. ही अत्यंत भयानक आणि दुर्देैवी घटना आहे. आमचा वारसा हा आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक आणि बहिर्जी नाईक या क्रांतीकारकांचा आहे. कायदा मोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. मात्र, आमचा पोलीसांवर आणि कायद्यावर विश्वास आहे. पोलीस योग्य पध्दतीने तपास करतील अशी आमची खात्री आहे. जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख हे स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

    पोलीस या घटनेतील आरोपींना मोकळे सोडणार नाहीत. चार आरोपी बारा तासांच्या आत पकडले आहेत. मात्र, उर्वरीत आरोपींनाही अटक करावी. तसेच गुन्ह्याचा निकाल हा फास्टट्रॅक कोर्टात जलदगतीने करावा. या हत्याकांडातील आरोपींना मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी. रामोशी समाजावरील अन्यायाच्या घटना लक्षात घेऊन त्यांना ऍट्रोसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी शितोळे यांनी केली.