मार्कंडेय यंत्रमाग संस्थेची त्वरीत चौकशी करा, अन्यथा…; डॉ. गोवर्धन सुंचू यांचा इशारा

    सोलापूर : मार्कंडेय यंत्रमाग लघु उद्योग संस्था मर्यादित सोलापूर व्हीको प्रोसेस शेजारी असून या संस्थेने महाराष्ट्र शासनाकडून ३३००० चौ.मी. मीटर इतकी जमीन कब्जे हक्काच्या किमतीने औद्योगिक प्रयोजनाकरिता नाममात्र दराने घेतलेली आहे. मात्र, त्या ठिकाणी मोजकेच इमारतींचा औद्योगिक वापर करीत आहे, तसेच या ठिकाणी शासनाचे नियम धाब्यावर बसवून ९० टक्के जागेवर आलिशान बंगले बांधून लोक राहत आहेत. तसेच या ठिकाणी टिपी नं. १, फायलन प्लॉट नं.२८-अ या संस्थेच्या ओपन स्पेस (जागेमध्ये) बेकायदेशीर टोलेजंग बांधकाम करून संस्थेचे चेअरमन नरसय्या राचर्ला राहत आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे याठिकाणी नागरिकांच्या सोईसाठी बगीचा, क्रीडांगण व ज्येष्ठ नागरिकांसाठीचा परिसर वापरण्याचा नियम आहे.

    वास्तविक पाहता वरील ठिकाणी मार्कंडेय लघु उद्योगाचे चेअरमन राचर्ला यांनी तत्कालीन खासदार धर्मण्णा सादूल, तत्कालीन आमदार प्रकाश यलगुलवार यांना या ठिकाणी लघू-उद्योग उभारल्यास शहरातील व पूर्व भागातील कामगारांना काम मिळेल, असे पटवून सांगितल्याने त्यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडे विनंती केली. शरद पवार यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन या जागेत प्रकल्प मंजूर केले,‌ असे यंत्रमाग क्षेत्रातील चर्चेतून समजते. पण प्रत्यक्षात सदर जागेवर लघु उद्योग न उभारता संस्थेचे चेअरमन राचर्ला यांनी प्लॉट पाडून या जागेची बेकायदेशीरपणे विक्री करुन करोडो रुपये कमावले आहे. तसेच आता सध्याच्या परिस्थिती प्लॉट हस्तांतर करण्यासाठी एका चौरस फुटामागे एक हजार रुपये घेत आहेत.

    तरी वरील संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाची चौकशी करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकाऱ्यांना २३ ऑगस्टला राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. तसेच, त्वरीत वरील संस्थेवर कायदेशीर कारवाई होत नसेल तर धरणे आंदोलन, चक्री उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी अंबिका गादास, शारदा गुंडेटी, विजया आडेप, विष्णु गुंडेटी, सतिश दासरी, सिद्राम नंदी, व्यंकटेश कुरापाटी, आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.