भूजल सर्वेक्षणातील संशोधनास मदत होणार : आयुक्त डाॅ. कलशेट्टी

भूजल सर्वेक्षण व सोलापूर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

    सोलापूर : राज्याचा भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे भुजल सर्वेक्षणातील संशोधनास मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या कौशल्यास चालना मिळणार असल्याची माहिती राज्याच्या भुजल सर्वेक्षण विभाग व विकास यंत्रणा विभागाचे आयुक्त डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

    सोलापूर येथील भुजल सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयात आज आयुक्त डाॅ. कलशेट्टी व अहिल्यादेवी होळकर विद्यापाठाचे कुलसचिव डाॅ. व्ही. बी घुटे यांचेत पाच वर्षाच्या सामंजस्य करारावर सह्या झाल्या. या प्रसंगी या सामंजस्य करारावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलातील डॉ. विनायक धुळप, डॉ. धवल कुलकर्णी, श्री. सुयोग बाविस्कर, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, सहायक भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तांत्रिक अधिकारी व्ही.डी.जाधव, कनिष्ठ अभियंता गुरुसिद्ध नारायणकर, सर्वेक्षक दीपचंद चंदनशिवे, भौ.मा.प्र.स. श्रीशैल बबलेश्वर, समाज विकास व क्षमता बांधणी तज्ञ सचिन झिंजाडे, कृषी तज्ञ गणेश शिंदे, जलसंधारण तज्ञ रणजीत गायकवाड व समन्वयक गणेश घाडगे आदी उपस्थित होते.

    राज्य शासनाचा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरशी सामंजस्य करार देशातील नावाजलेली भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांचे मध्ये भूजल क्षेत्रातील उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना संशोधनातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाच्या माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी पुढील पाच वर्षासाठी सामंजस्य करार झाला. या करारानंतर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या तंत्रज्ञान, क्षेत्रीय अभ्यास यांची माहिती मिळण्यासह भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये अनुभवाची संधी ही मिळणार आहे. तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला सोलापूर विद्यापीठातील तज्ञांकडून संशोधनामध्ये तसेच संयुक्तरित्या प्रकल्प राबविण्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रगत संसाधन, साधन यांचा उपयोग करता येणार आहे.

    यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (भा.प्र.से) म्हणाले, भूजलामध्ये करियर करू इच्छिणारे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मूळतः विध्यार्थी केंद्र अभिमुख प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्य यांची गरज लक्षात घेऊनच हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी विद्यापीठातील उपलब्ध साधने व भविष्यातील भूजल या विषयीच्या संशोधनामध्ये दोन्ही विभागांना या सामंजस्य कराराचा नक्कीच फायदा होणार असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलसचिव प्रोफेसर डॉ. वी बी घुटे म्हणाले, कुलगुरू मृणालिनी फडणवीस व डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचेमुळे सोलापूर विद्यापीठा बरोबर सामंजस्य करार होणेस मदत झाली आहे. यामुळे भूगर्भ शास्त्रीतील संशोधनास मदत होणार आहे. डाॅ. कलशेट्टी यांचे योगदान यांत महत्वपुर्ण राहणार आहे. प्रास्ताविक वरिष्ठ भुवैज्ञानिक मुश्ताक शेख यांनी केले तर विद्यापीठाच्या वतीने डॉ.विनायक धुळप यांनी केले.