सत्ताधारी भाजप नगरसेवकाचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; महापालिका आयुक्तांचा केला निषेध

    सोलापूर : सत्ताधारी भाजप नगरसेवक संतोष भोसले यांनी शोले स्टाईलने आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील प्रभाग क्रमांक 16 येथे विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

    गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उजनी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही योग्य नियोजन आयुक्त शिवशंकर यांना करता येत नसल्याची ओरड नगरसेवक भोसले यांनी केली आहे. जोपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही, अशी प्रथम भूमिका त्यांनी घेतली होती. यावर महापालिका प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसताना टाकीवरून उडी मारून जीव देईन, असा इशारा भोसले यांनी दिला.

    पोलिसांनी त्यांची समजूत काढत खाली उतरवून घेतले. पत्रकारांशी बोलताना नगरसेवक भोसले म्हणाले, शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात अनेकवेळा बैठका झाल्या. मात्र, आयुक्त शिवशंकर यांची उदासीनता असल्यामुळे शहरात पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे शहरवासियांचा घसा कोरडा राहत असल्याचा आरोप नगरसेवक भोसले यांनी केला आहे.