सोलापूर विद्यापीठ व जिल्हा परिषदेच्या सहकार्यातून ग्रामविकासाचे उपक्रम राबविणार

  सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व सोलापूर जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने विविध ग्रामविकासाचे उपक्रम राबविणार आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट दिली.

  या प्रसंगी सीईओ दिलीप स्वामी यांचे स्वागत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय राठोड, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डाॅ. गौतम कांबळे, वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डाॅ. रविंद्र चिंचोलकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, डॉ. अंबादास भासके, तेजस्वीनी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक उपस्थित होते.

  कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस व सीईओ दिलीप स्वामी यांची विविध उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. कुलगुरूंच्या दालनात झालेल्या या चर्चेत वृत्तपत्र विद्या विभाग व ग्रामीण विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग या तीन विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग विविध ग्रामविकासाच्या प्रक्रियेत घेण्याबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ आणि शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्न करू अशीही चर्चा झाली.

  वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाने उभारलेले विद्यावाहिनी रेडिओ केंद्र व अत्याधुनिक टी.व्ही. स्टुडिओचा उपयोग ग्रामीण भागातील विकासासाठी व संशोधनासाठी व योजनांना गती देण्यासाठी कशाप्रकारे करता येईल याबाबत चर्चा झाली. पाणी व स्वच्छता, प्राथमिक शाळा, विद्यार्थींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गाव कृती आराखडा, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी विद्यापीठाची मोलाची मदत होणार आहे.

  टीव्ही व रेडिओ स्टुडिओ, पुरातत्व म्युझियम, इकॉनॉमिक्स लॅबची केली पाहणी

  विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागात साकारलेल्या अत्याधुनिक टीव्ही व रेडिओ स्टुडिओची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली. यावेळी संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे, विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर, डॉ.अंबादास भासके, तेजस्वीनी कांबळे, डाॅ. बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक उपस्थित होते. सीईओ स्वामींनी इकॉनॉमिक्स लॅबचीही पाहणी केली. याबाबतची माहिती विभागप्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे, डॉ. रुपेश पवार यांनी दिली. सीईओ स्वामी यांनी पुराशास्त्र विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या पुरातत्व म्युझियमला भेट दिली. विभागप्रमुख डाॅ. माया पाटील मॅडम यांनी विभागाची व जिल्ह्यातील प्राचीन पुरातत्व साहित्याची माहिती दिली.

  विद्यापीठाची ग्रामविकासात मदत मोलाची ठरणार : सीईओ स्वामी

  सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामीण विकास क्षेत्रात लोकांचा सहभाग घेण्यासाठी विद्यापीठाच्या विविध विभागांची चांगली मदत होणार आहे. कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. विद्यापीठ विविध तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. याचा उपयोग ग्रामीण भागातील योजनांची अंमलबजावणी करताना होणार आहे, असेही सीईओ स्वामी यांनी सांगितले.