पंढरपूर तालुक्‍यात वाळू तस्करी; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठाचा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी करण्यासाठी वाळू माफिया सक्रिय असतात. मात्र, अनेक वेळा कारवाई करूनही अवैध वाळूवर आळा बसत नाही. पंढरपूर तालुक्यात वाळू तस्करी जोमात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कासेगाव हद्दीमध्ये पिकअप वाहन, वाळू सह चार आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली. या कारवाईत अडीच लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात सुरुवात केली आहे.

    याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनला मिळालेल्या माहितीवरून त्यांच्याकडील पथकाने कासेगावात चालू असलेल्या चोरून वाळू चोरीवर कारवाई केली. सदर छाप्यामध्ये १ पिकअप वाहन व त्यातील वाळू असा एकूण २ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची वाळूचोरी प्रकरणातील आरोपी सुजित महेश कोळी (वय २६), महावीर बाबासाहेब गंगथडे (वय २४), ज्ञानेश्वर रविंद्र कोळी (वय २४), सुमीत रविद्र कोळी (वय २२, सर्व रा. कासेगाव तालुका पंढरपूर) यांनी संगनमत करून सदरचा गुन्हा केल्याने चारही जणांना अटक करण्यात आली.

    सदरची कामगिरी ही ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात, पोलीस शिपाई देवेंद्र सुर्यवंशी, पोलीस शिपाई सोमनाथ नरळे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार उबाळे हे करत आहेत .