सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी संतोष धोत्रे

    सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी संतोष धोत्रे यांची साताराहून बदली झाली आहे. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांची नाशिक येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाल्यानंतर या रिक्तपदावर संतोष धोत्रे यांची बदली झाली.

    सोलापूर जिल्ह्यात उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संतोष धोत्रे यांनी प्रभावीपणे काम केले आहे. ऍग्रीकल्चरलमध्ये पदवीधर असलेले संतोष धोत्रे यांनी २००१ व २००२ मध्ये महसूल विभागामध्ये काम केले आहे. नाशिक व नगर येथे परीविक्षाधिन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर सोलापूर, धुळे व सिंधुदुर्ग येथे त्यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले. तत्कालीन पर्यावरणमंत्री यांचे ते खाजगी सचिव म्हणून मंत्रालयात काम केले आहे. २०१५ मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर जालना येथे तीन वर्षे व त्यानंतर सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहत होते.

    सोलापूर येथील कामाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. कीटकनाशके व फळांवरील अवशेष परिणाम यावर त्यांनी शोधनिबंध लिहिला आहे. २००३-४ मध्ये नगर जिल्ह्यात काम करीत असताना पाथर्डी येथील पाणी टंचाई आराखडा व त्यांची अंमलबजावणी हा पथदर्शी प्रकल्प ठरला. सोलापूर येथे कार्यरत असताना शासनाने वाढीव पदाचे निर्मितीबाबत नेमणूक आलेल्या राज्यस्तरीय समितीमध्ये त्यांनी काम केले आहे. धुळे येथे पाणी गुणवत्ता व सनियंत्रण या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे त्यांची राज्यस्तरीय अभ्यास गटात निवड झाली होती. २०१३-१४ मध्ये राजीव गांधी प्रशासकीय अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. जालना येथे जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली आहे.

    सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना स्वच्छ भारत मिशन ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा परिषदेला स्वच्छतेचा देशातील पहिला क्रमांक मिळाला. सातारा जिल्हा परिषेदेचा गौरव देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात आला. २०१९ व २०२०-२१ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. माण व खटाव या दुष्काळी भागात जानावरांचे छावणी व दुष्काळ निवारणाचे काम केले आहे.

    काम करण्याच्या सकारात्मक पध्दतीमुळे प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची ख्याती आहे. काटेकोरपणा, वेळेचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी यामुळे धोत्रे यांनी प्रभावीपणे काम केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.