महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा समाधान आवताडेंचा विजय : चंद्रकांत पाटील

पाच राज्यांच्या निकालानंतर देशात काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे, त्यामुळे भाजपला बंगालची सत्ता मिळाली नसली तरी ८० पेक्षा जास्त जागा पटकावल्या आहेत याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

  पुणे: पंढरपूर मंगळवेढा निकालानंतर येथे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयामुळे भाजपमध्ये सध्या विजयोन्मादाचे वातावरण आहे. या विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे, ते पुण्यात माध्यमांसमोर बोलत होते.

  आवताडे आघाडीवर भारी
  या जागेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरले होते. तिन्ही पक्षांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र, सध्या मतमोजणीमध्ये पंढरपूरमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर भारी पडले आहेत. त्यामुळे समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखाच आहे अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली म्हणाले.

  काँग्रेस पक्षाच्या राजकीय अस्तित्वाबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, त्यांनी पाच राज्यांच्या निकालानंतर देशात काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे, त्यामुळे भाजपला बंगालची सत्ता मिळाली नसली तरी ८० पेक्षा जास्त जागा पटकावल्या आहेत याकडे दुर्लक्ष करता येत नाही. ते म्हणाले की,

  “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात. पाच राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे. या पुढच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही संघटनात्मक पद्धतीने काम करणार,”

  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.
   
  सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’
  या विजयानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी देखील विजयी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘पावसात भिजलेले सरपन फक्त धूर करते, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’, असा खोचक सवाल ही गोपीचंद पडळकर यांनी व्टिट करत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना उद्देशून केला आहे. तर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीला जनतेची साथ असल्याचे समाधान दादाच्या विजयाने पुन्हा एकदा सिध्द झाल्याचे म्हटले आहे. माध्यमांना पाठविलेल्या चित्रफितीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पंढरीच्या पांडुरंगाने आणि जनता जनार्दनाने भाजपच्या पदरात जे विजयाचे दान दिले आहे त्याचा आदराने स्विकार करत आहोत.