महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शाळा सौंदर्यीकरण

    सोलापूर : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे. शिक्षणामध्ये त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळांचा परिसर सुंदर असणे आवश्यक आहे. या भावनेने महाराष्ट्र शासनाने 1 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शाळांचा आणि अंगणवाड्यांचा विकास करण्यासंबंधी शासन निर्णय जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 1678 कामे मंजूर करण्यात आली आहेत.

    शाळा सौंदर्यीकरणाच्या कामात एकुण 13 प्रकारची कामे करावयाची आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी आज सीईओ स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील उपस्थित होते.
    शाळा सौदर्यीकरणात पुढीलप्रमाणे कामे करावयाची आहेत.
    1.शाळेसाठी किचन शेड उभारणी.
    2.रेन वॉटर हार्वेस्टिंग.
    3.शाळा परिसरात शोष खड्डा.
    4.शौचालय बांधणे.
    5.खेळाचे मैदान व्यवस्थित करणे.
    6.शाळेसाठी संरक्षक भिंत.
    7.शाळा परिसरात वृक्ष लागवड.
    8.पेवर ब्लॉक बसवणे.
    9.शाळा परिसरात काँक्रीट नाला बांधकाम करणे.
    10.शाळेकडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे.
    11.शाळेतील बोअर पुनर्भरण करणे.
    12.शाळेतील बागकामासाठी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प तयार करणे.
    13.नाफेड कंपोस्ट प्रकल्प तयार करणे.

    पुढील पंधरा दिवसात गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांनी प्रत्येक दिवशी किमान पाच शाळांना भेटी देऊन शाळा सौंदर्यीकरण कामाचा आढावा घेऊन संबंधित शाखा अभियंता, प्रकल्प अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कामे वेगात करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. इतर वेळी वरील कामे शाळा व शाळा परिसरात करून घेण्यासाठी अगदी कमी निधी मिळतो म्हणून कामे होत नाहीत. तेव्हा या योजनेतून आपणास भरपूर निधी मिळत असल्याने कामे त्वरित करून घ्यावीत.

    शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी कामे सुरु करण्यापूर्वीचे शाळा व शाळा परिसराचे फोटो काढून घ्यावेत. त्याप्रमाणे पंचायत समिती स्तरावर कामकाजाचा पाठपुरावा करावा. शाळांच्या आजुबाजूला अथवा शाळेला जोडणाऱ्या रस्त्यावर झाडे झुडपे वाढली असतील तर ती काढून घ्यावीत. शाळा परिसरात चिखल होणार नाही अशा पद्धतीने कामे स्वतः लक्ष देऊन करून घ्यावीत. वृक्षारोपण करताना फुलांची व फळांची झाडे लावण्यावर भर देण्यात यावा जेणेकरून शाळेच्या सौंदर्याबरोबरच मुलांना ताजी फळेही खायला मिळतील.

    सध्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू असले तरी ज्या मुलांकडे मोबाईल नाही, अशा मुलांची यादी करून या मुलांना शिक्षकांनी गाव परिसरातील समाज मंदिर, मंदिर अथवा पाऊस नसताना झाडाखाली कोविडचे सर्व प्रोटोकॉल पळून विद्यार्थ्यांना शिकवावे, अशा सूचना यावेळी सीईओ स्वामी यांनी दिल्या.