schools and colleges reopens on 23 november 2020 in solapur maharashtra

सोलापूर : येत्या २३ नोव्हेंबरपासून सोलापूर शहर व जिह्यातील गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या सुमारे १५०० शाळा पुन्हा सुरू होणार असून, अडीच लाख विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा शाळास्तरावर करण्यात येत आहेत. शिक्षण विभाग व शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयारी करण्यात येत आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून राज्याबरोबरच सोलापूर शहर व जिह्यातील सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीनबरोबरच सर्व स्तरांतील विद्यालये बंद आहेत. नुकतेच राज्याच्या शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९वी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालक व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना सक्तीच्या करण्यात आल्या आहेत.

सोलापूर शहरात १२१, तर जिह्यात १३७६ शाळा आहेत. यांत जवळपास दोन लाख ५२ हजार विद्यार्थी असून, दोन सत्रांमध्ये शाळा भरविण्यासंबंधी नियोजन करण्यात आले आहे. एका वर्गात फक्त २० विद्यार्थीच असतील, असे नियोजन असून, शाळास्तरावर सकाळ, दुपार असे चार तासांचे सत्र होणार आहे. एक दिवसा आड वर्ग भरविण्यात येणार असून, गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या अध्यापनावर अधिक भर देण्यात येणार आहे.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची

शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली असून, पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात येणार नाही. सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क आदी सुविधांबाबत बारकाईने लक्ष देण्यात येत आहे.