उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील आयसीटीसी विभागास द्वितीय मानांकन

    अकलूज : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, सोलापूरकडून आयसीटीसी अकलूजला जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला असून, सर्व स्तरातून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.

    छत्रपती शिवाजीमहाराज सर्वोपचार रूग्णालय सोलापूर येथे झालेल्या मासिक आढावा बैठकीत उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील आयसीटीसी विभागास सोच सॉफ्टवेअरमधील 100 टक्के नोंद, एच एस एस या मुख्य धोरणनिश्चतीच्या कार्यक्रमात अचूक व उत्तम समन्वयासह अहवाल, दरमहा वेळेत व योग्यरीत्या होणारे मासिक अहवाल सादरीकरण, एच आय व्ही-टिबी समन्वय साधत 100% रुग्ण संदर्भसेवेसह तपासणीच्या उद्दिष्टपूर्ती व वार्षिक उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल जिल्ह्य़ातील द्वितीय क्रमांकाचे उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला.

    उत्कृष्ट समुपदेशक, उत्कृष्ट प्रयोगशाळा तंत्रज्ञ व उत्कृष्ट लिंक एआरटी स्टाफ नर्स या तिन्ही विभाग सर्वोत्तम कामगिरी साठी देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरणाप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, जिल्हा पर्यवेक्षक कृष्णा सकट, जिल्हा मूल्यमापन अधिकारी दिनेश राठोड व जिल्ह्य़ातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

    उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील आयसीटीसी विभागास द्वितीय मानांकन प्राप्त झाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, रुग्ण कल्याण समितीचे मार्गदर्शक धैर्यशील मोहिते-पाटील, युवा नेते शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी, पदाधिकारी यांचे विशेष अभिनंदन केले.