ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक, खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पित्ताशयात खडे आहेत. त्यावरचं ऑपरेशन पार पडलं आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

    सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूरमधील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत.

    गणपतराव देशमुखांनी वयाची ९६ वर्षे पूर्ण केली आहेत. एवढं वय असूनही ते आतापर्यंत मतदारसंघात फिरत होते, जनसामान्यांचे प्रश्न तडीस लावून नेते होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पित्ताशयात खडे आहेत. त्यावरचं ऑपरेशन पार पडलं आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

    कोण आहेत गणपतराव देशमुख?

    गणपतराव देशमुख यांनी तब्बल ५४ वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.