जिल्ह्यात कोविड केअर सेंटर तात्काळ उभे करा ; जि.प.पदाधिकाऱ्यांच्या सूचना

समाधान आवताडे म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर लवकर सुरू करावेत, रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत, गोळ्या औषधांवर बरे होणारे रुग्ण ऑक्सीजन वर किंवा व्हेंटिलेटरवर जाऊ नये, यासाठी वेळेवरच उपाययोजना कराव्यात.

     

    सोलापूर : ग्रामीण भागात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत महत्वाची बैठक अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, या बैठकीला संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सदस्य आनंद तानवडे, मदन दराडे, ऍड सचिन देशमुख, बाळासाहेब देशमुख, गणेश पाटील, अतुल पवार, अजित तळेकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, वरिष्ठ लेखा अधिकारी सुर्वे, सरोज काझी, देवानंद गुंड , सरपंच डॉ अमित व्यवहारे, आष्टी ग्रामसेवक गडेकर हे उपस्थित होते,

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नंतर दोन्ही तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती, कोव्हीड केअर सेंटर उभे करण्यासाठी निधीची उपलब्धता कशी होणार याची चर्चा झाली, लवकरच लवकर संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांना वेळेवर उपचार व नियंत्रणाखाली ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या विषयावर चर्चा झाली, लवकरच लवकर हे सेंटर उभे करून कोरोना बाधितांवर उपचार करण्याचा निर्णय झाला, सदस्य तानवडे, दराडे, ऍड देशमुख यांनी विविध सूचना केल्या, या बैठकीत सरपंच डॉ अमित व्यवहारे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड सेंटरला आपली सेवा देण्याची तयारी दर्शवली.

    सभापती विजयराज डोंगरे म्हणाले, झेडपीचा कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय स्तुत्य आहे,झेडपी सेस, आरोग्य विभागाचा निधी राज्य सरकारचा निधी वापर करावा, मोहोळ तालुक्यात आष्टी, शेटफळ, नरखेड, कुरुल, कामती, बेगमपूर याठिकाणी कोविड केअर सेंटर लवकरच सुरू होणार आहेत.

    समाधान आवताडे म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर लवकर सुरू करावेत, रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत, गोळ्या औषधांवर बरे होणारे रुग्ण ऑक्सीजन वर किंवा व्हेंटिलेटरवर जाऊ नये, यासाठी वेळेवरच उपाययोजना कराव्यात.