Shirla Corona in Solapur Jail; 13 Prisoner Corona tested positive

जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या सब जेलमधील २० पैकी १३ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या कैद्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या सब जेलमधील २० पैकी १३ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या कैद्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    दरम्यान, मंगळवारी रात्री तीन कैद्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व कैद्यांची तपासणी करण्यात आली. यात आणखी दहा कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सध्या या सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

    सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याने क्वारन्टाईन आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सध्या ते घरातूनच शासकीय कामकाज हाताळत आहेत. सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांसोबत मृतांचाही आकडा वाढू लागला आहे. मृतांमध्ये सहव्याधी असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

    जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे एका पाहणीत पुढे आले आहे. सोलापूर शहरात ७ हजार ५९२ पुरुष रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५ हजार १६३ महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच ४४९ पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, २२० महिलांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाला आहे.