‘त्या’ शिवसैनिकाचाही अखेर उपचारादरम्यान मृत्यू

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोहोळ येथे राजकीय द्वेषातून कट रचून बुधवारी (दि. १४) टेम्पो अंगावर घालून दोन शिवसैनिकांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यातील एक जण घटनेच्या दिवशीच जागीच मयत झाला होता. तर दुसऱ्या शिवसैनिकाचा सोमवारी (दि. १९) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    दोन्ही मृत शिवसैनिकांनी मोहोळ नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील बोगस मतदारयादीतील नावांबाबत हरकती घेतल्या होत्या. त्याचाच राग मनात धरून राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांनी वाहन चालकाच्या मदतीने त्यांचा खून केला असून, तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या या तक्रारीवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यातील दोषींची चौकशी केली नाही. याबाबत तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी मृत विजय सरवदे याच्या नातेवाईकांनी व मित्र परिवाराने त्याचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर आणून ठेवला होता.

    या घटनेमुळे मोहोळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते व तहसील कार्यालयाच्या आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी मृताच्या नातेवाईकांना या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी दोन पोलिस पथके नेमण्यात आली असून, लवकरात लवकर त्यांना अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर सरवदे याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

    मोहोळ नगरपरिषदेच्या ८ व ९ या प्रभागांमधील बोगस नावांबाबत हरकत घेतल्याने व रमाई घरकूलाच्या नगरपरिषदेतून गहाळ झालेल्या फायलींच्या संदर्भात का आंदोलन केले याचा राग मनात धरून राजकीय द्वेषातून कट रचून संगनमताने डबलसीट दुचाकीस्वारांवर पाठीमागून टेम्पो घालून सतीश शिरसागर या शिवसैनिकाचा खून केला. दुसऱ्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षांच्या पतीसह चार जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात दि १५ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील जखमी विजय नागनाथ सरवदे याचा दि १९ जुलै रोजी उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

    दरम्यान, या प्रकरणी अटकेत असलेल्या वाहन चालक असवले याने संतोष सुरवसे, रोहित फडतरे व पिंटू सुरवसे या तिन्ही संशयित आरोपींच्या सांगण्यावरूनच मयत क्षीरसागर व सरवदे यांच्या दुचाकीवर टेम्पो घातला होता. असा कबुलीजबाब पोलिसांना दिला. त्याने दिलेल्या जबाबात घटनेच्या आठ दिवसांपूर्वीच क्षीरसागर व सरवदे या दोघांना मारण्यासाठी एका हॉटेलमध्ये तिघांनी व चालक अशा चौघांनी मिळून कट रचला होता. तो अयशस्वी झाल्यामुळे वरील तिघांनी चालकाला दमदाटी करून पुन्हा ही घटना करायला भाग पाडले व त्यांच्या सांगण्यावरूनच मी हे केले असल्याचा आसवले याने जबाब दिला असल्याची माहिती मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.