धक्कादायक! पहिल्याच ग्रामसभेत सरपंचाना मारहाण ; मोहोळ तालुक्यातील घटना

मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे ग्रामपंचायतीची सरपंच निवड २३ फेब्रुवारी रोजी पार पडली. यात वाल्मिकी जालिंदर निळे यांची सरपंच तर पमाबाई शंकर कोरे यांची उपसरपंचपदी निवड झाली. त्यामुळे त्यांच्या विरोधातील गट नाराज होता.

  मोहोळ : सरपंच निवडीनंतर पाहिल्याच मासिक सर्वसाधारण सभेला निघालेल्या सरपंचाला सभा घ्यायची नाही, असे म्हणत सरपंचाला मारहाण करून जखमी करण्यात अाले. बुधवारी (िद. १०) मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे ग्रामपंचायत कार्यालयात ही घटना घडली. वाल्मिकी जालिंदर निळे (रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) असे जखमी सरपंचाचे नाव आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी झालेल्या तक्रारींमध्ये एकूण ९ जणांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हा दाखल
  सरपंच वाल्मिकी जालिंदर निळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकरणी राजेंद्र औदुंबर विरपे, अंकुश उर्फ भाऊ मारुती कदम, देविदास भिवा कदम, सोमनाथ विलास विरपे, बाळू भिवा कदम (सर्व रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) आदि पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भांडणे चालू असताना भांडणे सोडवायला गेलेले देविदास भिवा कदम व संजय सुभाष कोरे यांनाही मारहाण व शिवीगाळ करण्यात अाली. याप्रकरणी सरपंच वाल्मिकी जालिंदर निळे, शिवराज वाल्मीकी निळे, करीम पिरसाब पाटील, दत्तात्रय महादेव गुजर, (रा. सय्यद वरवडे) यांच्यावर देविदास कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

  घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
  मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे ग्रामपंचायतीची सरपंच निवड २३ फेब्रुवारी रोजी पार पडली. यात वाल्मिकी जालिंदर निळे यांची सरपंच तर पमाबाई शंकर कोरे यांची उपसरपंचपदी निवड झाली. त्यामुळे त्यांच्या विरोधातील गट नाराज होता.

  दरम्यान १० मार्च रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडीनंतर पहिल्याच मिटींगला जात असताना ग्रामपंचायत कार्यालयाच्या पोर्चमध्ये दरवाजात उभ्या असलेल्या गावातील मंडळीनी तू मीटिंगला जायचे नाही, असे म्हणून सरपंच वाल्मिकी निळे यांना ओढून मारहाण केली. त्यांना सोडवायला गेलेले शिवराज निळे यांनाही मारहाण करण्यात आली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली अाहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार बी. बी. शेलार करीत आहेत.