अजित पवार विरोध करत असेलेल्या ‘त्या’ फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी – प्रकाश आंबेडकर

    पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी हिम्मत लॉकडाऊन करण्यात दाखवली तीच हिम्मत त्यांनी वीज मंडळाने 50 टक्के वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिला ती फाईल मागवून घ्यावी आणि ज्याला अजित पवार विरोध करत आहेत त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. तरच आम्ही म्हणू या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.

    नाहीतर हे सरकार मला अजित पवार चालवताना दिसत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते.

    आमचे काही चालत नाही, आमचे कोणी ऐकत नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आपली इभ्रत राखण्यासाठी या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. पडायचे की तिथेच खितपत पडायचे याचा निर्णय करावा, असेही ते म्हणाले. एकाबाजूला काँग्रेस नेते म्हणतात की आमची इभ्रत राखली जात नाही आणि आता जर त्यांना नागवे केले जात असेल आणि त्यांना त्यांची इज्जत झाकायची असेल तर त्यांना बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही.

    लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. 100 कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात आहे. जनतेने 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी, द्यावी असेही आंबेडकर म्हणाले.