पंतप्रधान मोदींना सोलापुरातून पाठविले चक्क साडेसोळा रुपये; त्याचं कारण…

    सोलापूर : केंद्र सरकारने एलपीजीची तोकडी गॅस सबसिडी नागरिकांचा खात्यात टाकून क्रूर चेष्टा केली. पेट्रोल, डिझेल व खाद्य तेलामुळे महागाईचा भडका उडाला आहे. तो विझण्यासाठी प्रत्येक गॅस सिलेंडर मागे १ रुपये ३८ पैसे एवढी मोठी सबसिडी प्रत्येक भारतीय नागरिकांच्या खात्यात जमा करून महागाईचा दाह कमी करत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल बोळकोठे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

    या निवेदनासोबत त्यांनी आपल्या एक वर्षाची एलपीजी गॅसची सबसिडी 16 रुपये 56 पैशांचा धनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने तयार करून आपल्या निवेदनासोबत तो जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला.

    यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. संपूर्ण देश महागाई, पेट्रोल-डिझेल तसेच गॅस दरवाढीने होरपळून निघत आहे. असे असताना पंतप्रधान मोदी हे देशाची क्रूर चेष्टा करत आहेत, त्यांना विमान घेण्यासाठी, आपले सेंट्रल विस्टा हे निवासस्थान बांधण्यासाठी, पक्षाचे कार्यालय बांधण्यासाठी पैसे हवे असतील तर सर्व नागरिकांच्या एलपीजी गॅसची सबसिडी त्यांनी घ्यावी, अशी टीका केली.