सोलापुरचे सीईओ दिलीप स्वामी यांना ‘नवभारत’ समूह प्रतिष्ठेचा ‘हेल्थकेअर समिट’ पुरस्कार जाहीर

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष, प्रभावी व उत्कृष्ट प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांंना यंदाचा नवभारत वृत्तपत्र समूहाचा हेल्थकेअर समिट पुरस्कार जाहीर झाला आहे. ३१ जुलै रोजी राजभवन (मुंबई) येथे सांयकाळी ४ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

    आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘नवभारत समुहातर्फे हेल्थकेअर समिट २०२१’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्वामी यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कलेल्या कोरोना काळातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे व अस्लम शेख (पालकमंत्री, मुंबई) या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

    दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना आपल्या संकल्पनेतून समाजोपयोगी विविध उपक्रम राबवले आहेत. विशेषत: कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जाणीव जागृती अभियान, वार्डनिहाय सर्वेक्षण, माझे गाव कोरोनामुक्त गाव, माझे दुकान माझी जबाबदारी, गाव तिथे कोविड सेंटर, लसीकरण स्लीपवाटप यंत्रणा, तणावमुक्तीसाठी संवाद अभियान, माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी, माझी मुलं, माझी जबाबदारी तसेच लहान मुलांचे आरोग्य तपासणी अभियान अशा या अनेक उपक्रमांमधून सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

    कोरोना काळात जिल्हाभर दौरे करत असताना दिलीप स्वामी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचार घेत असताना त्यांनी दवाखान्यातूनच कार्यालयीन कामकाज सांभाळले. श्रमाला प्रतिष्ठा देऊन निष्ठेने काम केल्याबद्दल स्वामी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.