पालकमंत्री भरणे यांनी जिल्ह्याचा विकास रोखला; जिल्हा परिषद अध्यक्षांची शरद पवारांकडे कैफियत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात कैफियत मांडली आहे.

    सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे (Aniruddha Kamble) यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्याविरोधात कैफियत मांडली आहे. शुक्रवारी शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडी गटातील सदस्यांनी निधी वाटपासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुका संदर्भात विचार विनिमय करण्यात आला.

    कोट्यवधींचा निधी हा अखर्चित राहिला आहे. पालकमंत्री भरणे यांच्या उदासीन कारभारामुळे निधी पडून असल्याची तक्रार सदस्यांनी मांडली. या सर्व पार्श्वभूमीवर अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी शरद पवार यांना पत्राद्वारे निधी वितरण करण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री भरणे यांनी निधी रोखून धरला असून, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

    सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समिती निधीच्या वितरणावरुन जिल्ह्यातील आमदार व नियोजन समितीचे सदस्य असलेल्या 27 जिल्हा परिषद सदस्य यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपाअभावी प्रलंबित आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषदेचे 27 सदस्य आहेत. कायद्याप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचा निधी हा खर्च करण्याचा १०० टक्के अधिकार हा जिल्हा परिषदेस आहे. परंतु, या जिल्ह्यामध्ये पूर्वी जिल्हा नियोजन समितीमध्ये ३५ टक्के निधी पालकमंत्री, आमदार व खासदारांना तर ६५ टक्के निधी जिल्हा परिषदेचे सदस्य याप्रमाणे निधी वितरीत होत होता. परंतु आमदार महोदयांच्या वादामुळे सदर निधी प्रशासकीय मान्यतेअभावी पडून राहिला आहे.

    पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आमदार महोदयांच्या दबावामुळे निर्णय घेत नाहीत. तरी याबाबत योग्य त्या सूचना आपल्या स्तरावरुन पालकमंत्री भरणे यांना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पत्र जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते यांनी शरद पवारांना दिले आहे.