Solapur teacher wins Rs 7 crore award; The first Indian teacher to receive the Global Teacher Award

सोलापूर : सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार(Global Teacher Award) आज जाहीर झाला आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार पटकावणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक आहेत.

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा  ग्लोबल टीचर पुरस्कार दिला जातो. सात कोटींचा हा पुरस्कार  रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे.

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी याची घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले असल्याने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

जगभरातील १४० देशांतील १२ हजाराहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले यांची घोषणा करण्यात आली आहे. क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचे नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले आहे. यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल, असा विश्वास डिसले यांनी व्यक्त केला आहे.