मोहोळमधील विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या सोमेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उजनीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या उर्वरित गावांना पाण्याचा लाभ द्यावा, नदीवरील बंधाऱ्यांची गळती थांबवून ते पूर्ण क्षमतेने बंधारे भरून घ्यावेत, युती शासनाच्या काळातील रखडलेल्या उपसा सिंचन योजना पूर्ण कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर (Somesh Kshirsagar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.

    मोहोळ मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार नारायण पाटील, माढ्याचे संजय कोकाटे व शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट घेतली.

    यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या मागण्या सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असून, यामध्ये युती सरकारच्या काळात मंजूर झालेल्या व स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेल्या आष्टी व शिरापूर सिंचन योजना अद्यापही रखडलेल्या आहेत. यासह पर्यावरणमंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक-२ पोखरापूर तलावात पाणी सोडण्याची योजना पूर्ण करण्याचे उचित आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना व्हावेत.

    यासह भीमा – सीना जोड कालवा प्रकल्पाच्या धर्तीवर मोहोळ तालुक्यातील सिना-भोगावती जोड कालवा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करावी, मोहोळ तालुक्यातील अनेक भाग उजनीच्या पाण्यापासून वंचित असून, त्या भागाला पाणी मिळण्यासाठी सर्व्हेचे आदेश देऊन पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांना करावी. तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतीची बांधकामे जुनी झाली आहेत. त्यामुळे “स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” मधून नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्यास निधी मिळावा.

    याशिवाय मतदार संघातील सर्व रस्ते खड्डे मुक्त करावेत, मोहोळ येथे अद्यावत उपजिल्हा रुग्णालय व्हावे, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना निधी मिळावा यासह तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवावेत, याचीही चर्चा झाली.