बार्शीत लसीकरणासाठी विशेष मोहीम; नगरपरिषदेकडून फिरते लसीकरण केंद्र

राज्याच्या मिशन कवचकुंडल (Mission Kavach Kundal) या योजनेअंतर्गत बार्शी नगरपरिषदेच्या वतीने नागरी लसीकरणासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानामार्फत विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्याच्या मिशन कवचकुंडल (Mission Kavach Kundal) या योजनेअंतर्गत बार्शी नगरपरिषदेच्या वतीने नागरी लसीकरणासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानामार्फत विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. शहरातील ज्या नागरिकांनी अजूनही लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतला नाही, त्यांच्यासाठी सोमवारपासून शहरात विविध ठिकाणी फिरते लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

    याबाबत नगराध्यक्ष ऍड. असिफ तांबोळी म्हणाले, केंद्र आणि राज्याच्या धोरणाप्रमाणे बार्शीतही कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची शासकीय सुविधा उपलब्ध होणार नाहीत. त्यासाठी ज्या नागरिकांनी अजूनही लस घेतली नाही. त्यांच्यासाठी या विशेष उपक्रमाचे अभियान राबविण्यात येणार आहे. यात सर्वांनी सहभाग घेऊन लसीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले.

    यावेळी मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील म्हणाल्या, शहरातील विविध ठिकाणी विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी. विशेषतः बाजारपेठेतील प्रत्येक दुकानातही हा उपक्रम राबवला जाणार आहे.