सोलापूर जिल्ह्यात जलपुनर्भरण अभियान राबवा : संचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी

  सोलापूर : राज्यात एक लाख विद्यार्थ्यांना जलपुनर्भरणसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात जलपुनर्भरण अभियान प्रभावीपणे राबवा, असे आवाहन राज्याच्या भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे संचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
  सोलापूर जिल्हा परिषद येथे आज जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, भुजल सर्वेक्षण विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

  या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे होते. या प्रसंगी भुजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.

  राज्यात एक लाख विद्यार्थ्यांना जलपुनर्भरणसाठी प्रशिक्षण : डाॅ. कलशेट्टी

  राज्यात एक लाख विद्यार्थ्यांना जलपुनर्भरणसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात किमान सहा हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. येत्या १६ जुलैपर्यंत जलपुनर्भरण मोहिम सुरू राहणार आहे. या मोहिमेत पाण्याच्या जागृतीसाठी कलाकारांचा सहभाग घेण्यात येत आहे. सर्व शासकीय कार्यालये व माध्यमिक शाळांमध्ये जलपुनर्भरण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना डाॅ. कलशेट्टी यांनी दिल्या.

  पाणी संकलनाच्या कामासाठी लोकसहभाग घ्या

  ग्रामपंचायतीचा १५ वा वित्त आयोगात पाणी व स्वच्छतेसाठी निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आराखड्यात ज्या ग्रामपंचायतींना जसं पुनर्भरणाची कामे घेतली आहेत. त्यांनी प्रभावीपणे राबवावी. तर पाऊस पाणी संकलनाच्या कामासाठी लोकसहभाग घ्या, असे आवाहन संचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. स्वच्छतेप्रमाणे पाण्याची चळवळ उभी करा, असेही त्यांनी सांगितले.

  सोलापूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणाचे काम समाधानकारक

  सोलापूर जिल्ह्यात संपर्कातील व्यक्तींचा शोध वेळेत घेऊन तपासणी केल्यामुळे कोरोना नियंत्रणात आला. सीईओ दिलीप स्वामी यांनी सुरू केलेल्या ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ अभियानाचे कौतुक करून यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झटून काम केल्याचे संचालक डाॅ. कलशेट्टी यांनी सांगितले. जलपुनर्भरणामुळे शेतकरी बांधवांना चांगला फायदा होणार आहे. पावसाचा थेंब अन् थेंब जमिनीत मुरविला तरच भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

  जलपुनर्भरण ग्रामपंचायतींना बंधनकारक : दिलीप स्वामी

  सोलापूर जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींनी शासकीय इमारतीमध्ये जलपुनर्भरणासाठी आराखड्यातील कामासाठी १५ वा वित्त आयोगातील निधी वापरावा. याबाबत ग्रामपंचायतीनिहाय आढावा घेण्यात येईल. अंदाजपत्रके, प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता घेण्यात याव्यात. पाऊस निघून गेल्यानंतर काही उपयोग होणार नाही. वेळेत कामे पूर्ण करा. दर्शनी भागात कामे सुरू करा. कारण शेतकरी यांना पाहता येतील. त्याचा आदर्श घेऊन ते पुढील कामे करतील. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख यांनी सोलापूर जिल्ह्यातील भूजल पाणी पातळी वाढवण्यास भूजल पुनर्भरण करण्यासाठी विहिर, विंधन विहिर पुनर्भरण व छतावरील पाऊस पाणी संकलन संकल्पना आणि तंत्रज्ञान यावर सादरीकरण केले.