मोहोळकडे येणाऱ्या सेवा रस्त्याला गणेश मंदिरापासून रस्ता जोडून द्यावा या मागणीसाठी निवेदन

  मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोहोळ-पंढरपूर रस्त्याच्या सुरू असलेल्या पालखी मार्गाच्या कामामुळे शहरासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रमौळी गणेश मंदिर व जिल्हा परिषद शाळेला जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार असून, मोहोळकडे येणाऱ्या सर्व्हिस रस्त्याला गणेश मंदिरापासून सर्व्हिस रस्ता जोडून द्यावा किंवा गणेश मंदिर समोर रस्ता दुभाजक करण्याची मागणी चंद्रमौळी गणेश मंदिर शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

  मोहोळ -पंढरपूर-आळंदी या चौपदरी पालखी मार्गाचे काम मोहोळ शहराजवळील चंद्रमौळी गणेश मंदिर येथे चालू आहे. मोहोळकडे येण्यासाठी जुन्या पुलालगत नवीन पूल बांधून सर्विस रस्ता जोडण्यात येणार आहे. परंतु चंद्रमौळी गणेश मंदिर व जिल्हा परिषद शाळेला दोनशे ते अडीचशे मीटर विरुद्ध दिशेने जावे लागणार आहे. अकराव्या शतकातील चंद्रमौळी गणेश मंदिर हे शहरासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, या ठिकाणी गणेश जयंती चतुर्थी व गणेशोत्सवाच्या काळात मोठी गर्दी होते. तसेच मंदिरासाठी दर्शन बस ला थांबा आहे.

  गणेश मंदिरालगत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून या शाळेत अंगणवाडी ते ४ थी पर्यंत वर्ग भरतात. शाळेत जवळपास २०० हून अधिक मुले शिक्षण घेतात. मोहोळ शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये  गणेश मंदिरची शाळा विद्यार्थी संख्येत व गुणवत्तेत अग्रेसर असल्यामुळे पालकांचा व विद्यार्थ्यांचा या शाळेला चांगला प्रतिसाद आहे. जर नवीन पुलापासून मोहोळ शहराकडे रस्ता केला तर गणेश मंदिराकडून शहराकडे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. दत्तनगर, कळसे नगर, इंदिरानगर झोपडपट्टी, विश्वनाथ नगर, कुरुल रस्ता परिसरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे.

  गणेश मंदिर व शाळेला येण्यासाठी संपूर्ण सर्विस रस्ता न झाल्यास त्या परिसरात अपघाताची शक्यता आहे. अपघाताच्या भीतीपोटी सर्व सोई सुविधांनी सुसज्ज असलेली जिल्हा परिषदेची शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडणार आहे. त्यामुळे चंद्रमौळी गणेश मंदिरासमोर रस्ता दुभाजक किंवा मंदिरापासून नवीन पुलापर्यंत सर्विस रस्ता जोडण्यात यावा अशा मागणीचे निवेदन चंद्रमौळी गणेश मंदिर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने तहसीलदार राजशेखर लिंबारे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना देण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश धनवे, सदस्य भारत नाईक, औदुंबर गायकवाड, दादासाहेब गायकवाड, मनोज पुराणिक, शिक्षक सत्यवान खंदारे आदी उपस्थित होते.

  ११ व्या शतकातील चंद्रमौळी गणेश मंदिर हे मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तर मंदिराशेजारी असलेली जिल्हा परिषद शाळाही शहरातील विद्यार्थी व पालकांसाठी सर्वात लोकप्रिय शाळा आहे. गणेश मंदीर समोरून सर्विस रस्ता करण्याबाबत प्रशासनाने भूमिका घ्यावी. या ठिकाणाहून सर्विस रस्ता झाला नाही तर शाळेतील विद्यार्थी व भाविकांना अपघाताचा मोठा धोका होणार आहे. प्रशासनाने याबाबत दखल घेऊन सर्विस रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहे.

  – भारत नाईक, पालक समिती सदस्य, गणेश मंदिर जिल्हा परिषद शाळा, मोहोळ