अजब गोष्ट ! कोरोनाची लस घेताच ‘त्यांच्या’ शरीराला चिकटल्या स्टीलच्या वस्तू

    पंढरपूर : कोरोनाच्या लसीचा डोस घेतल्यानंतर मानवी शरीराला स्टीलच्या वस्तू चिकटल्याचा प्रकार नाशिक येथे अरविंद सोनार यांच्याबाबत घडला होता. त्यानंतर विठ्ठलाच्या पंढरपुरातही नरहरी कुलकर्णी यांनी कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर एक तासाने यांच्या शरीराला स्टीलच्या वस्तू व पैशाचे नाणे चिटकू लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

    पंढरपुरात बघता बघता हा कुतूहलाचा विषय बनला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, नाशिक येथील अरविंद सोनार यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर स्टीलच्या वस्तू चिटकू लागल्याची बातमी टीव्हीवर पाहिली व आपणही तो प्रयोग करून पाहावा या उद्देशाने आज पंढरपूरमधील कुंभार घाट येथे राहणाऱ्या नरहरी कुलकर्णी यांनी सकाळी साडे दहाच्या दरम्यान कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. घरी आल्यानंतर त्यांनी सहज स्टिलचे नाणे आणि चमचे हे आपल्या शरीराला चिकटतात का हे पाहिले असता त्यांच्या ही शरीराला स्टिलच्या वस्तू चिकटत असल्याचे निदर्शनास आले.

    नाशिकची पुनरावृत्ती विठ्ठलाच्या पंढरीत घडल्यानंतर या घटनेची चर्चा पसरताच अनेकांनी कुलकर्णी यांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पाहता पाहता हा कुतूहलाचा विषय बनला.

    सुरुवातीच्या दोन तासांमध्ये तीव्रता अधिक

    कोरोनाची लस घेतल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमध्ये या वस्तू अधिक तीव्रतेने चिकटत असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान कोरोनाची लस घेण्यामध्ये कोणताही धोका नसल्याचे सांगितले आणि कोरोना लस घेतल्यानंतर कोणताही त्रास होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाची लस सर्वांनी घ्यावी. त्यामुळे कोणताही त्रास होत नाही. फक्त प्रयोग केला आणि मलाही याची प्रचिती आली असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.