सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक

    सोलापूर : सोलापूर शहरातील रेल्वेलाईन परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर गुरुवारी दुपारी अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यावेळी कार्यालय बंद होते या दगडफेकीत कार्यालयाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, खिडक्यांवर दगड अडकून पडल्याचे चित्र दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. यावेळी त्यांना खिडक्यांवर दगड अडकल्याचे दिसून आले.

    बुधवारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूर शहरात याचे पडसाद उमटले. पडळकर यांच्या गाडीवर थेट दगड घालण्यात आला. याबाबतचे चित्रण समोर आले आहे. त्यानंतर शहरात बराच गोंधळ झाला. पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलीस आयुक्तालयात ठिय्या मांडला, शेवटी पोलीस आयुक्तांच्या आश्‍वासनानंतर कार्यकर्ते शांत झाले.

    दरम्यान, संशयित तरुणाविरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच गोपीचंद पडळकर यांच्यासह 25 जणांवर जमावबंदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.