तत्कालीन सचिव बिराजदार यांच्या देय रकमा थांबवा; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची मागणी

    सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले सचिव अंबादास बिराजदार यांची ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड व इतर देय रक्कम देऊ नये, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचारी बसवराज वैजिनाथप्पा आग्रे यांनी केले आहे.

    तत्कालीन सचिव बिराजदार हे 31 मार्च 2021 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची देय रक्कम संस्था देणे आहे तरी त्यांच्या देय रकमा थांबविण्याचे पत्र बाजार समिती प्रशासनाकडे दिले आहे. बिराजदार हे बाजार समितीमध्ये असताना त्यांच्याकडील लेखापाल हे पद होते. त्यावेळी संस्थेची एफ.डी स्टेट बँक ऑफ इंडिया मार्केट यार्ड शाखा येथे मार्च 2019 मध्ये 1 कोटी 20 लाख ठेवलेली होती. ती एफ.डी. त्यांनी कोणाचीही मंजूरी न घेता परस्पर आपल्या मुदतीपूर्वी तोडलेली आहे. यामुळे बाजार समितीचे व्याजाचे लाखो रूपयाचे नुकसान केले आहे. याबरोबर बाजार समितीला फसवून स्वतःचे व त्यांच्या पत्नीचे मेडिकल बिले अनेक वेळ उचलले आहे. पत्नी कर्नाटक राज्यातील धूळखेड येथे शिक्षिका आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारकडूनही मेडिकल बिले घेतल्याचे समजते.

    याशिवाय पती, पत्नी एकाच घरात राहत असताना त्यांनी दोघांचेही नावाने हाऊस रेंट अलाउंस घेतल्याचे समजते. बिराजदार स्वतः गंगामैय्या हॉस्पिटल येथे कॅन्सरचे उपचार घेत असताना इन्शुरन्स कंपनीकडून व बाजार समितीकडूनही वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले घेऊन बाजार समितीची फसवणूक केली असून, संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणतेही रक्कम न देण्याची मागणी केली आहे.
    दरम्यान बाजार समितीचे तत्कालीन सचिव यांना याबाबत विचारले असता त्यांनी वेळेपूर्वी रक्‍कमा काढण्यात आले नसल्याची माहिती दिली.