दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी : कॉ. आडम मास्तर

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथे शेतकरी आंदोलन करत असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा चिरंजीव आशिष मिश्रा हा नराधम माथेफिरू भरधाव वेगाने आंदोलकांवर गाडी चालवून त्यांना मारून टाकतो. ही माणुसकीला आणि लोकशाहीला नख लावणारी दुर्दैवी घटना आहे.

    सोलापूर : एकीकडे देशाची राजधानी दिल्ली येथे शेतकरी पंतप्रधानांच्या दारात तीन कृषी काळे कायद्यांच्या विरोधात अविश्रांत लढाई करत आहेत. दुसरीकडे याच लढ्याच्या अनुषंगाने उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथे शेतकरी आंदोलन करत असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा चिरंजीव आशिष मिश्रा हा नराधम माथेफिरू भरधाव वेगाने आंदोलकांवर गाडी चालवून त्यांना मारून टाकतो. ही माणुसकीला आणि लोकशाहीला नख लावणारी दुर्दैवी घटना आहे. अशा या घटनेला कारणीभूत असणाऱ्या आशिष मिश्राला शिक्षा देण्याऐवजी आदरतिथ्य केला जातो. ही मोठी शोकांतिका आहे. राव अथवा रंक न्याय सर्वांना समान आहे. या कायद्याच्या नीतीचा विस्मरण न होता निपक्षपाती चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी आक्रमक व आग्रही मागणी माजी आमदार कॉ. आडम मास्तर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

    सोमवारी (दि.11) महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपूर येथील शेतकरी आंदोलकांवर झालेल्या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन बंदमध्ये सहभागी झाले. महाविकास आघाडीने बंदची घोषणा केलेली असताना सुद्धा पोलीस प्रशासनाकडून बंद हाणून पाडण्याचा आटोकाट प्रयत्न झाले. सकाळी माकपचे कार्यकर्ते कॉ. अनिल वासम सकाळी 8 वाजता व कॉ. युसुफ शेख (मेजर) यांना 9 वाजता राहत्या घरातून तर कॉ. एम.एच.शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, सलीम मुल्ला यांच्यासह प्रमुख लढाऊ कार्यकर्त्यांना दत्तनगर येथील कार्यालयातच नजरकैदेत ठेवले.

    तसेच कॉ. आडम मास्तर यांच्या घराबाहेर पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवण्यात आला. पोलिसांच्या या दडपशाहीला चकवा देत जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे पहिल्या टप्प्यात काही प्रमुख कार्यकर्ते कॉ. नलिनी कलबुर्गी, शेवंता देशमुख, दाउद शेख, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, वीरेंद्र पद्मा यांच्यासह २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

    त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कॉ. नरसय्या आडम, कॉ. एम.एच.शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नगरसेविका कामिनी आडम, अनिल वासम, आरीफा मणियार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते चालत पूनम गेटवर येऊन जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविले. यानंतर पोलिसांनी कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना बळजबरीने ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाणे येथे दाखल केले.

    या आंदोलनात म.हनीफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, विल्यम ससाणे, नरेश दुगणे, बाबू कोकणे, बापू साबळे, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, जावेद सगरी, दत्ता चव्हाण, शहाबुद्दीन शेख, दीपक निकंबे, श्रीनिवास गड्डम, वासिम मुल्ला, मुन्ना कलबुर्गी, प्रवीण आडम, भारत पाथरूट, बजरंग गायकवाड, अप्पाशा चांगले, विनायक भैरी, डेविड शेट्टी, नागेश म्हेत्रे, आरिफ मणियार, सिद्धाराम उमराणी, मल्लिकार्जुन बेलीयार, योगेश अकिम, नानी माकम, मल्लेशम कारमपुरी, नितीन कोळेकर, अंबादास गडगी, अंबादास बिंगी, श्रीनिवास तंगडगी हे सहभागी होते.