टेंभुर्णीत व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद

उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे घडलेल्या घटनेवरुन केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी व घटनेत दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांना श्रध्दांजली म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने 'महाराष्ट्र बंद'चे आवाहन करण्यात आले. त्यास माढा तालुक्याच्या टेंभुर्णी शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला.

    टेंभुर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे घडलेल्या घटनेवरुन केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी व घटनेत दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांना श्रध्दांजली म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन करण्यात आले. त्यास माढा तालुक्याच्या टेंभुर्णी शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रहार संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्ष व संघटनांच्या वतीने करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निषेध सभा घेऊन केंद्र सरकारचा मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांच्या प्रति असंवेदनशील पणाचा निषेध करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीकडून घटनेच्या निषेधार्थ निवेदन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना देण्यात आले.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले, परिषदेचे सदस्य तुकाराम ढवळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामभाऊ वाघमारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख सुरेश लोंढे सोमनाथ कदम, संभाजी पाटील, भजनदास गायकवाड, रामभाऊ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सचिन होदाडे, महेंद्र वाकसे, संजय कुटे, वैभव कुटे, सुरेश कुटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.