मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील तरुणाची आत्महत्या

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अज्ञात कारणावरून मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो येथील २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी चंद्रकांत सपकाळ हे मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. एक महिन्यापूर्वी त्यांचेही निधन झाले. त्या ठिकाणी त्यांचा २२ वर्षीय मुलगा किरण हा त्याच्या आईसमवेत राहत होता. तो चालक म्हणून काम करत होता. १७ रोजी त्याने पटवर्धन कुरोली ता पंढरपूर येथे आईला नातेवाईकांकडे सोडले व तो घरी शिरापूर येथे आला. त्यावेळी रात्री त्याच्या विवाहित बहिणीने त्याला फोन करून तू घरी जेवायला येण्यासाठी सांगितले होते. मात्र, मी उद्या सकाळी तुझ्याकडे जेवायला येतो, असे बहिणीला सांगून त्याने फोन बंद केला.

    दरम्यान, १८ जुलै सकाळी १०.३० पूर्वी घरी कोणी नसताना किरण याने घराच्या दारास आतून कडी लावून पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. नातेवाईकांनी आवाज दिला असता आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने घराचे दार तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी किरण याने आत्महत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी श्रीकांत सावंत यांनी मोहोळ पोलिसात माहिती दिली असून, अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.