जिल्ह्यात सुजलाम् अभियान राबविणार : दिलीप स्वामी

  सोलापूर : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुढील १०० दिवसांत हागणदारीमुक्त व शाश्वतता टिकविण्यासाठी जिल्ह्यात स्थायित्व व सुजलाम अभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने सांडपाणी व्यवस्थापनासाठी ४० हजार ३७५ शौषखड्डे घेण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

  लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदरीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करण्यासाठी आणि ग्रामीण भागात शोषखड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करणे, याबाबींचा समावेश आहे. या कालावधीत जिल्ह्यात अभियान कालावधीत किमान 40 हजार 375 शोषखड्डे तयार करण्याचे लक्ष निश्चित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तालुकानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हागणदारीमुक्तीची शाश्वतता टिकविणे आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक इतक्या शोषखड्डयांचे बांधकाम पूर्ण करणे, यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करावा.

  हागणदारीमुक्तीची (ओडीएफ) शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्डयांच्या बांधकाम करणे यासाठी १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे. नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. नादुरुस्त शौचालय अंतर्गत शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंबांची निवड करण्यासाठी व्दितीयस्तर हागणदारीमुक्ती ग्रामपंचायत पडताळणी पूर्ण करावी तसेच सर्व नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करावी.

  अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करण्यासाठी अभियान कालावधीमध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा कक्ष आणि विविध विभागांचे खाते प्रमुख यांच्या क्षेत्रीय भेटी होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ मार्गदर्शिके प्रमाणे हागणदरीमुक्त शाश्वतता आणि शोषखड्यांचे बांधकाम यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत मिशन १५ वा वित्त आयोग किंवा मनरेगा यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे.

  पूर्ण झालेल्या शोषखड्यांची (वैयक्तिकस्तर व सार्वजनिक स्तर) माहिती स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत उपलब्ध असलेल्या SBM-२.० मोबाईल ऍप्लिकेशनमधून नोंद करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये याचा पाठपुरावा करून १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान यशस्वी होईल, यादृष्टीने नियोजन करण्यात असल्याचे सांगितले. या अभियानाबाबत दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व गटविकास आधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, असेही स्मिता पाटील यांनी सांगितले.

  जिल्हयात 425 गावात विशेष अभियान : अध्यक्ष अनिरूध्द कांबळे

  जिल्हयात १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त शाश्वतता टिकविणेसाठी ४२५ गावात काम करणेत येणार आहे. नदीकाठच्या गावात प्रथम प्राधान्य असेल असेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी सांगितले.