दगडफेकीत सुशीलकुमार शिंदे यांचे पोस्टर फाटले; काँग्रेस भवनातील डिजिटल फलकावर फेकली शाई

सोलापूरातील काँग्रेस भवनातील लावण्यात आलेल्या डिजीटल फलकावर अज्ञातांनी दगडफेक केली असून, या दगडफेकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे डिजिटल फोटो फाटले आहे.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूरातील काँग्रेस भवनातील लावण्यात आलेल्या डिजीटल फलकावर अज्ञातांनी दगडफेक केली असून, या दगडफेकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचे डिजिटल फोटो फाटले आहे. विविध पदाधिकाऱ्यांच्या फलकावर शाई फेकण्यात आली आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास उघडकीस आला. नेमकी शाई कोणी फेकली हे मात्र समजू शकले नाही.

    शाई फेकून संबंधित इसम फरार झाले. शाई फेकण्याचे कळताच कार्यालयीन कर्मचारी राजू नीलगंठी यांनी सर्व बॅनर साफ करून घेतले. भिंतीवर मात्र तशीच शाई दिसत होती. ही माहिती मिळताच शहराध्यक्ष प्रकाश वाले हे काँग्रेस भवनात आले त्यांनी पाहणी केली.

    काँग्रेस भवनाच्या बाहेर शहराध्यक्ष प्रकाश वाले युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, एनएसयुआय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांची फलक आहेत. या तिन्ही फलकावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे फोटो त्या फोटोवर काळी शाई फेकून मारण्यात आली. मागील दोन दिवसांपूर्वी काँग्रेस भवनमध्ये शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि माजी परिवार सभापती केशव इंगळे यांच्यामध्ये हमरीतुमरी होऊन प्रसंग हाणामारीपर्यंत गेला होता.

    त्यानंतर प्रकाश वाले यांनी थेट राजीनामा देतो, अशी घोषणा माइक घेऊन केले. या वादामुळे केशव पिंगळे यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनाच्या बाहेरील असलेल्या फलकांवर काळी शाई फेकण्याचा प्रकार घडला. त्या वादातून तर हा प्रकार घडला नाही ना असे तर्कवितर्क काढले जात आहेत. प्रकाश वाले व ज्येष्ठ नेते सुनील रसाळे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहरामध्ये सध्या चांगले काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांना ते बघवत नाही. हिंमत असेल तर समोर येऊन लढा, असे आव्हान दिले.