श्रीधर कलशेट्टी, त्रिमूर्ती राऊत यांच्यावर कारवाई करा; आरोग्य कर्मचारी संघटनेची मागणी

    सोलापूर : लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आयटीसेलचे कर्मचारी श्रीधर कलशेट्टी, त्रिमुर्ती राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाय. पी. कांबळे यांनी केली आहे.

    जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर आमदार जयंत आसगावकर, आमदार अरुण लाड यांची माहिती वेळेत अपलोड करण्याची जबाबदारी कलशेट्टी व राऊत यांच्यावर होती. पुणे पदवीधर व शिक्षक आमदारांची निवडणूक होऊन वर्ष लोटले. त्यानंतर झालेल्या मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची माहिती अपलोड करण्यात आली. अशाप्रकारे लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याप्रकरणी या दोघांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

    विशेष म्हणजे हे दोघेही आरोग्य सेवक आहेत. संगणकाची कोणतीही पदवी नसताना केवळ वशीलेबाजीवर नियुक्ती घेतली. पाच वर्षे मुख्यालयात असताना प्रवासभत्ता घेतला. याबाबत तक्रार केल्यावर प्रशासनाने ही रक्कम वसूल केली. जिल्हा परिषदेत संगणक पदवी घेतलेले अनेक कर्मचारी आहेत. पात्र कर्मचाऱ्यांची आयटी सेलला नियुक्ती करून या आरोग्य सेवकांना कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मूळ ठिकाणी आरोग्य केंद्रात पाठवावे, असेही कांबळे यांनी म्हटले आहे.